वृत्तसंस्था/ दोहा
फुटबॉलचा महासंग्राम मानल्या जाणाऱया विश्वचषक स्पर्धेच्या शुभारंभाचा बार रविवारी सायंकाळी झालेल्या एका नेत्रदीपक सोहळय़ात आणि फुटबॉलचा थरार अनुभवण्यासाठी उताविळय़ा बनलेल्या रसिकांच्या जल्लोषात उडाला. यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यातील ‘अ’ गटातील पहिल्या सामन्यापूर्वी हा समारंभ झाला. आजवरच्या सर्वांत खार्चिक असलेल्या या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ तितक्याच दिमाखदार पद्धतीने दोहाच्या उत्तरेस 40 किलोमीटर अंतरावर अल खोरमध्ये असलेल्या आणि 60 हजार प्रेक्षक क्षमतेच्या अल बायत स्टेडियममध्ये झाला. एखाद्या अरब राष्ट्रात ही स्पर्धा आयोजित केली जाण्याची ही पहिलीच खेप आहे.
उद्घाटन समारंभाची मुळात योजना सोमवारी कतारच्या पहिल्या सामन्यापूर्वी आयोजित करण्याची होती. मात्र दोन सामने झाल्यानंतर हा समारंभ झाला असता. त्यामुळे कतारचा सलामीचा सामना एका दिवस आधी रविवारी आणण्यात आला. काही दिग्गज कलाकारांनी उद्घाटन समारंभात सादरीकरणाच्या ऑफर्स नाकारल्यामुळे हा कार्यक्रम होण्याआधीच चर्चेत आला होता. मात्र प्रत्यक्ष सोहळय़ाने सर्वांचे डोळे दिपून टाकण्याबरोबर या वादांनाही मागे टाकले.
या समारंभात अनेक नामवंत कलाकारांनी आपले कार्यक्रम सादर केले. त्यात दक्षिण कोरियाच्या ‘बीटीएस’ या बॉय बँडच्या सात सदस्यांपैकी एक जुंगकूक याचा कार्यक्रम ही उपस्थित फुटबॉल चाहत्यांना विशेष भेट ठरली. त्याने कतारी गायक फहाद अल-कुबैसीसह विश्वचषकाचे अधिकृत गीत ‘ड्रीमर्स’ सादर केले. हॉलीवुडचा सुपरस्टार मॉर्गन फ्रीमन याने समारंभात निवेदकाची भूमिका साकारताना फुटबॉलचा खेळ सर्वांना एकत्र आणतो असे सांगितले. तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाची निर्मिती मागील विश्वचषकाच्या आठवणी जागविण्याच्या संकल्पनेवर करण्यात आल्याने पार्श्वभूमीला जुन्या विश्वचषक स्पर्धांची ‘वेव्हिंग दि फ्लॅग’सारखी गीते वाजत होती.
मागील विश्वचषक स्पर्धांची फेरफटका मारून गेलेली बोधचिन्हे, यंदाच्या स्पर्धेचे सर्वत्र झळकणारे आणि धूमधडाक्यात स्टेडियममध्ये अवतरलेले बोधचिन्ह ‘लईब’, स्टेडियमबाहेर झालेली मनमोहक आतषबाजी, पारंपरिक अरेबिक गीते व त्यावरील तसेच अन्य गीतांवरील नृत्ये, कतारी परंपरेची जागतिक संस्कृतीशी घातलेली सांगड अन् जबरदस्त दृकश्राव्य इफेक्ट्स ही या उद्घाटन समारंभाची वैशिष्टय़ ठरली. कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी फिफा अध्यक्ष जियानी इन्फेन्टिनो, विविध राष्ट्रांतील अधिकारी, अतिमहनीय व्यक्ती हजर होत्या. क्रिएटिव्ह डायरेक्टर मार्को बालिच यांनी सांगितल्यानुसार, उद्घाटन समारंभात जगातील सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शक आणि प्रकाश तंत्रज्ञांसह 900 लोकांच्या चमूचे योगदान राहिले.