मंत्री एच. के पाटील यांची विधानपरिषदेत माहिती
बेळगाव : राज्यातील 25 हजार ऐतिहासिक वारसा स्थळांपैकी 810 स्थळेच सुरक्षित करणे शक्य झाले आहे. उर्वरित वारसा स्थळांचा सरकार व समुदायांच्या मदतीने विकास करणे शक्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने ‘आमचे स्मारक दत्तक योजना’ सुरू केली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कायदा-संसदीय कामकाज आणि पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी दिली. शुक्रवारी विधानपरिषदेत सदस्य हणमंत निराणी यांच्या लक्षवेधी सूचनेवर एच. के. पाटील यांनी उत्तर दिले. पर्यटनाला प्रोत्साहन देऊन पर्यटनस्थळांचा विकास करण्याच्या दृष्टीने विजापूर जिल्हा आणि बागलकोट जिल्ह्यातील ऐहोळे, बदामी, पट्टदकल, कुडलसंगम, बिळगी या पर्यटनस्थळांची निवड करण्यात आली आहे.
या पर्यटन स्थळांच्या तालुका केंद्रांमध्ये भांडवल गुंतविण्यास पुढे येणाऱ्यांना साहाय्यधन आणि प्रोत्साहन देण्यात आले. बागलकोट आणि विजापूर या जिल्ह्यांत बदामी, बनशंकरी, ऐहोळे, पट्टदकल, गोलघुमट, शिवमंदिर, आलमट्टी जलाशयाच्या बॅकवॉटर परिसरातील पक्षीधाम ही पर्यटनस्थळे आहेत. बागलकोट जिल्ह्यातील बदामी येथील गुहालये, ऐहोळे येथील दुर्गामंदिर परिसर आणि जागतिक वारसास्थळ यादीतील पट्टदकल येथील मंदिरे तसेच विजापूर जिल्ह्यातील गोलघुमट या स्मारकांची देखभाल व जबाबदारी भारतीय पुरातत्त्व संरक्षण (एएसआय) विभागाच्या अखत्यारित येते. बनशंकरी मंदिर, श्री बनशंकरी देवस्थान ट्रस्ट व शिवमंदिर खासगी ट्रस्टकडे आहे. आलमट्टी बॅकवॉटर परिसरातील पक्षीधाम वनखात्याच्या अखत्यारित येते. त्यामुळे पक्षीधाम निर्माण करणे पर्यटन खात्याच्या कक्षेत येत नाही. तरीदेखील वनखात्याशी चर्चा करून पक्षीधाम निर्मितीला प्राधान्य दिले जाईल, असे एच. के. पाटील यांनी सांगितले.
बागलकोट, विजापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासावर भर
सध्या जारी झालेल्या 2024-2029 च्या नूतन कर्नाटक पर्यटन धोरणात बागलकोट व विजापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी गुंतवणूक करण्यास पुढे येणाऱ्या उद्योगांना 5 टक्के अतिरिक्त साहाय्य धन देण्याची तरतूद आहे. शिवाय या जिल्ह्यातील पर्यटनस्थळे अधिक प्राधान्याची समजून त्यांच्या विकासावर भर दिला जाईल.
थ्री-स्टार हॉटेलचे काम प्रगतीपथावर
पट्टदकल येथे स्मारके असणाऱ्या ठिकाणी वाहन पार्किंग सुविधा, कॅफेटेरिया, पर्यटन माहिती केंद्र, हस्तकला वस्तू संकुल आदी सुविधा एकाच छताखाली निर्माण केल्या जातील. याकरिता 29.25 कोटी रुपये खर्चातून कामे हाती घेतली जात आहेत. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी बागलकोट जिल्ह्यातील बदामी येथे 72 खोल्यांचे थ्री-स्टार हॉटेल निर्माण करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे.









