बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये समाधान
प्रतिनिधी /बेळगाव
सांबरा येथील विमानतळापासून रेल्वेस्थानकापर्यंत सुरू करण्यात आलेल्या ‘रेल टू एअर’ या बसफेरीला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अत्यल्प तिकिटात उत्तम सेवा मिळत असल्याने प्रवाशांचा ओढा बसकडे आहे. शहरातील मुख्य भागात बस थांबत असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांच्या हस्ते ‘रेल टू एअर व एअर टू रेल’ या बसफेरीला सुरुवात झाली आहे. परिवहन मंडळाने एका मिनीबसची व्यवस्था करून सांबरा येथील विमानतळापासून शहरात येण्यासाठी व्यवस्था केली. मध्यंतरी बस नसल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. खासगी वाहनचालक जितके सांगेल तितके भाडे देऊन विमान प्रवाशांना शहरात यावे लागत होते. त्यामुळे या मार्गावर बस सुरू करण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली होती.
परिवहन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार विमानतळावरून दिवसांतून चार वेळा तर रेल्वेस्थानकावरून दिवसांतून तीन वेळा बसफेरी असणार आहे. सांबरा विमानतळ ते मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत 100 रुपये तर रेल्वेस्थानकापर्यंत 150 रुपये प्रति व्यक्तीला तिकीट दर आकारण्यात येणार आहे. बसमध्ये प्रवाशांना आरामदायी व्यवस्था करण्यात आली असून त्यांचे साहित्य ठेवण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे.









