10 काऊंटरमधून स्वीकारले अर्ज
बेळगाव : नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन आता जिल्हा व तालुका पातळीवरील कार्यालयांच्या पायऱ्या झिजवण्याची गरज नाही. जनता दर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून एकाच छताखाली सर्व खात्यांचे अधिकारी उपलब्ध होत आहेत. त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडता येतात व तोडगाही मिळविता येतो, असे बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनी सांगितले. सोमवारी बैलहोंगल येथील वीरभद्रेश्वर देवस्थानाजवळील शिवबसव कल्याण मंटपात झालेल्या जनता दर्शन कार्यक्रमाला आमदार महांतेश कौजलगी यांच्या हस्ते चालना देण्यात आली. अधिकाऱ्यांनीही नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. त्यामुळे सरकारी कार्यालयांना चकरा मारण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही, असा सल्लाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रत्येक 15 दिवसांतून एकदा जनता दर्शन कार्यक्रम करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी अनुकूल ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, बैलहोंगलच्या प्रांताधिकारी प्रभावती फकिरपूर, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, बेळगावचे तहसीलदार बसवराज नागराळ आदींसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. जनता दर्शनसाठी जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी बेळगावहून बसमधून प्रवास केला. नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी 10 काऊंटर सुरू केले होते. बेळगाव येथे झालेल्या पहिल्या जनता दर्शन कार्यक्रमात 750 तर खानापूर येथे 500 अर्ज आले होते. यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित खात्यांना पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.









