नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने तसेच खादी उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा सध्या सरदार्स मैदानावर भरविण्यात आला आहे. मागील चार दिवसात बेळगावमधील नागरिकांनी प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद दिला आहे. या प्रदर्शनातून 1 कोटी 4 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. हे प्रदर्शन शनिवार दि. 4 जानेवारी रोजी दुपारपर्यंत नागरिकांना पाहता येणार असल्याची माहिती जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्यासोबतच महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने वस्तू प्रदर्शन व विक्री मेळावा सुरू केला. एकूण दीडशेहून अधिक महिला बचत गटांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. 50 हून अधिक खादी उत्पादनांचे स्टॉल आहेत. सकाळी 10.30 ते रात्री 9.30 पर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. त्याचबरोबर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी दहा स्टॉल उभारण्यात आले असल्याची माहिती आमदार राजू सेठ यांनी दिली.
‘उत्पादकांपासून थेट ग्राहकांपर्यंत’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. खादी उत्पादनांवर 5 टक्केपर्यंतची सवलत देण्यात येत आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे दुखवटा पाळत सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. 2 व 3 जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. अधिकाधिक नागरिकांनी मेळाव्याला उपस्थिती लावून महिला बचत गटांना हातभार लावावा, असे आवाहन जि. पं. सीईओंनी केले. यावेळी डीआयसीचे सहसंचालक सत्यनारायण भट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.









