हजारो विद्यार्थ्यांकडून भगवद्गीतेचे अध्ययन : डिसेंबर 21 पर्यंत चालणार
बेळगाव : सोंदा स्वर्णवल्ली महासंस्थानच्यावतीने आयोजित भगवद्गीता अभियानाला शहरात उत्तम प्रतिसाद मिळाला. या मठाचे पीठाधीश श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य व श्रीमद् गंगाधरेंद्र सरस्वती स्वामींनी ऑक्टोबर 2007 पासून राज्यभरात भगवद्गीता अभियान सुरू केले आहे. या अभियानाला बेळगावमध्ये उत्तम प्रतिसाद लाभला आहे. 21 नोव्हेंबर रोजी प्रारंभ झाला असून 21 डिसेंबरपर्यंत हे अभियान चालणार आहे. सध्या बेळगाव शहरात 80 व ग्रामीण भागात 50 हून अधिक श्लोक केंद्रे सुरू आहेत. शहरामध्ये 22 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी व तालुक्यामध्ये 11 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेचे अध्ययन सुरू केले आहे. डिसेंबर 21 पर्यंत साधारण 100 केंद्रे स्थापन होतील, अशी अपेक्षा आहे.
विविध स्पर्धांचेही आयोजन
गीता जयंतीनिमित्त दि. 22 रोजी गीतापठण सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे. दि. 16 रोजी अनगोळ येथील संत मीरा शाळेमध्ये शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीता स्पर्धा होणार आहे. दि. 18 रोजी याच शाळेमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धा होऊन राज्यस्तरीय स्पर्धासुद्धा दि. 23 रोजी होणार आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. डिसेंबर 18 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 या वेळेत गीता समन्वय हा वैशिष्ट्यापूर्ण कार्यक्रम गुरुदेव रानडे मंदिर येथे होणार आहे. याप्रसंगी डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. के. एल. शंकरनारायण, डॉ. व्ही. एस. माळी, डॉ. अनंत एम. के., नागेंद्र दास, पं. श्रीनिधी आचार्य, नित्यस्थानंद स्वामी, मधुसूदन शास्त्राr आदी उपस्थित राहणार आहेत. दि. 23 रोजी सकाळी लिंगराज कॉलेजच्या मैदानावर राज्यस्तरीय महासमर्पण होणार आहे. त्याच दिवशी या अभियानाचा समारोप होणार आहे.









