पुणे, दिल्लीला सेवा सुरू झाल्यास आणखी प्रवासीसंख्या वाढणार
बेळगाव : बेळगावमधून दहा शहरांना सेवा दिली जात असल्याने विमान प्रवाशांची संख्या वाढत आहे. जून महिन्यात 23,184 प्रवाशांनी बेळगाव विमानतळावरून प्रवास केल्याची नोंद विमानतळ प्राधिकरणाकडे आहे. यामध्ये बेळगाव-बेंगळूर-बेळगाव या मार्गावर सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात पुणे व दिल्ली या सेवा सुरू झाल्यास प्रवासी संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. बेळगावमधून अहमदाबाद, इंदूर, जोधपूर, जयपूर, मुंबई, नाशिक, सूरत, तिरुपती व नागपूर या शहरांना स्टार एअर विमानसेवा देते. तर बेंगळूर व हैदराबाद या दोन शहरांना इंडिगो विमानसेवा पुरविते. मागील काही दिवसांत महत्त्वाच्या शहरांच्या विमानसेवा बंद झाल्याने प्रवासी संख्या कमी झाली होती. परंतु, आता पुन्हा एकदा हळूहळू विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
ऑक्टोबरपासून पुणे, दिल्ली दोन्ही शहरांना विमानसेवा
बेळगाव-बेंगळूर या मार्गावर सर्वाधिक म्हणजेच 5016 प्रवाशांनी प्रवास केला आहे. हैदराबाद 1555, अहमदाबाद 1100, मुंबई 710, सूरत 789, जोधपूर 512, इंदूर 550, नागपूर 425, तिरुपती 610, जयपूर 450 प्रवाशांनी प्रवास केला आहे. ऑक्टोबर महिन्यापासून पुणे व दिल्ली या दोन्ही शहरांना विमानसेवा सुरू होणार असल्याने प्रवासी संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.









