नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 5.88 टक्क्मयांवर ः 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या बऱयाच दिवसांपासून महागाईचे चटके सहन करणाऱया देशवासियांना किंचित दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्यात किरकोळ (रिटेल) महागाईचा दर 5.88 टक्के या 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये किरकोळ महागाई दर 6.77 टक्के होता. तर वर्षभरापूर्वी म्हणजे नोव्हेंबर 2021 मध्ये हाच दर 4.91 टक्के होता.
नोव्हेंबर महिन्यात खाद्यपदार्थांच्या महागाई दरात मोठी घट झाली आहे. ऑक्टोबरमध्ये 7.01 टक्के असलेला अन्नधान्य महागाई दर नोव्हेंबरमध्ये 4.67 टक्क्मयांवर आला आहे. शहरांबरोबरच ग्रामीण भागातही अन्नधान्य महागाईत घट झाली आहे. सर्वात मोठा दिलासा म्हणजे किरकोळ चलनवाढीचा दर आरबीआयच्या 6 टक्के या निर्धारित उच्चतम पातळीच्या खाली आला आहे. आरबीआयने 2 ते 6 टक्के महागाई दराचा निर्धारित दर निश्चित केला आहे. यापूर्वी किरकोळ चलनवाढीचा दर सातत्याने आरबीआयच्या निर्धारित दरापेक्षा जास्त असल्याने सर्वसामान्य जनतेला महागाईचा अतिरिक्त भार सहन करावा लागत होता.
अन्नधान्य महागाईत मोठी घसरण
खाद्यपदार्थांच्या महागाई दरात झालेली घसरण हे किरकोळ महागाई कमी होण्याचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले. शहरी भागातील किरकोळ महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये 6.53 टक्के होता, तो नोव्हेंबरमध्ये 3.69 टक्क्मयांवर आला आहे. तर ग्रामीण भागातील किरकोळ महागाईचा दर ऑक्टोबरमध्ये 7.30 टक्के होता, तो नोव्हेंबरमध्ये 5.22 टक्क्मयांवर आला आहे. पालेभाज्या आणि भाज्यांचा महागाई दर -8.08 टक्क्मयांवर आला आहे. तर फळांच्या महागाईचा दर 2.62 टक्के इतका नोंद झाला आहे.
रेपोदरवाढीला ब्रेक लागण्याची शक्यता
किरकोळ चलनवाढीचा दर 7.79 टक्क्मयांवर पोहोचल्यानंतर आरबीआयने महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपोदरात वाढ केली होती. सध्या रेपो दर 4 टक्क्मयांवरून 6.25 टक्के झाला आहे. आता नजिकच्या काळात महागाईचा दर असाच घसरत राहिला, तर नव्या वर्षात रेपोदरवाढीला ब्रेक लागू शकतो. आरबीआयकडून रेपो दर वाढवण्याची प्रक्रिया थांबवली जाऊ शकते किंवा किरकोळ महागाई दरात घट झाल्यास व्याजदरही स्वस्त होऊ शकतात.









