अंदमान आणि निकोबार ही बेटे तेथील समुद्रकिनारे, दुर्मीळ जैवविविधता आणि आदिवासी जमाती यासाठी ओळखली जातात. अंदमानातील सेल्युलर जेल तर ऐतिहासिक आहे. यातील ग्रेट निकोबार बेटावर आता तब्बल 75 हजार कोटी खर्चून एक टाऊनशिप, ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ, गॅस व सौरऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे. एकूण तीन टप्प्यात पुढील 30 वर्षात या प्रकल्पावर कार्यवाही होणार आहे. चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाने अलीकडच्या वर्षांत या बेटाचा विकास करण्याची गरज भासू लागली. दुसरीकडे या प्रकल्पामुळे जैवविविधता, स्थानिक आदिवासी जमाती यावर होणाऱया परिणामांवर पर्यावरणवादी चिंता व्यक्त करत आहेत.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तज्ञ मूल्यांकन समितीने ग्रेट निकोबार बेटातील एका प्रचंड मोठय़ा पायाभूत सुविधा आणि पर्यटन प्रकल्पासाठी पर्यावरण आणि किनारी नियमन क्षेत्र (CRZ) मंजुरी देण्याची शिफारस केली आहे. यामुळे तेथील 15 टक्के वनक्षेत्र (130 स्क्वेअर किमी) अन्यत्र स्थलांतरित केले जाईल. टप्प्याटप्प्याने तेथील 9.64 लाख झाडे तोडण्यात येणार आहेत. हा प्रकल्प अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह एकात्मिक विकास महामंडळाच्या अधिपत्याखाली होत आहे. जंगलांनी व्यापलेल्या या बेटावर मानवी वावर होणार असल्याने तेथील जैवविविधता आणि दुर्मीळ आदिवासी जमाती यांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण होणार आहेत.
बेटावरील वनस्पती, प्राणी आणि स्थानिक लोकसंख्येवर या प्रस्तावित प्रकल्पाचे होणारे परिणाम लक्षात घेता तज्ञ मूल्यमापन समितीने 22 आणि 23 ऑगस्टला झालेल्या बैठकीत एकात्मिक प्रकल्पाचे धोरणात्मक स्वरुप लक्षात घेऊन पुढील कार्यवाहीला मान्यता दिली. 75 हजार कोटीचा (750 अब्ज) प्रकल्प हा एक आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल (ICTT), एक टाऊनशिप, ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ, गॅस व सौरऊर्जा प्रकल्प असा आहे. एईकॉम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने नीती आयोगासाठी ग्रेट निकोबार बेटाच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्व व्यवहार्यता अहवाल तयार केला होता.

166 चौरस किलोमीटर क्षेत्र निश्चित
तज्ञ मूल्यमापन समितीच्या (EAC) माहितीनुसार विमानतळ भारतीय नौदलाच्या ऑपरेशनल नियंत्रणाखाली तसेच संयुक्त लष्करी-नागरी दुहेरी वापरासाठी म्हणून विकसित केला जाणार आहे. यातील पहिला टप्पा 2036 (2021 पासून) पर्यंत अपेक्षित आहे. तर दुसरा टप्पा 2037 ते 2051 पर्यंत अपेक्षित आहे. तर कंटेनर टर्मिनल 2027-28 च्या दरम्यान कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. एकूण 166 चौरस किलोमीटर क्षेत्र विकासासाठी निश्चित केले जाणार असून त्यापैकी 72 चौरस किलोमीटरचा भाग पहिल्या तीन टप्प्यात हाती घेतला जाईल. टाऊनशिप व्यावसायिक, औद्योगिक आणि निवासी झोनने बनलेली असेल. तसेच जमिनीचा एक मोठा भाग विविध प्रकारचे पर्यटन प्रकल्प आणि उपक्रमांसाठी राखीव ठेवला जाणार आहे.
तीन देखरेख समित्या
तज्ञ मूल्यमापन समितीने वन्यजीव संरक्षण आणि आदिवासी कल्याणासाठी विशिष्ट अटी लादल्या आहेत. विशेषकरून लेदरबॅक समुद्री कासव, निकोबार मेगापॉड्स, खाऱया पाण्यातील मगरी आणि इतर अनेक प्रजाती तसेच खारफुटीची पुनर्स्थापना, कोरल ट्रान्सलोकेशन आणि स्थानिक शॉम्पेन आणि निकोबारीस आदिवासी लोकसंख्येच्या कल्याणासाठी या योजना आहेत. पर्यावरण व्यवस्थापनाशी संबंधित बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी तीन स्वतंत्र देखरेख समित्या स्थापन करायच्या आहेत. लिटल निकोबार (14 चौरस किलोमीटर, लेदरबॅक कासवांच्या संरक्षणासाठी), मेंचल (1.3 चौरस किलोमीटर, मेगापॉड्ससाठी) आणि मेरिओ बेटे (2.8 चौरस किलोमीटर, कोरलसाठी) येथे तीन नवीन वन्यजीव अभयारण्ये प्रस्तावित आहेत.

122 चौरस किलोमीटर क्षेत्र जंगलव्याप्त
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जंगलांनी व्यापलेल्या बेटाचा एक लांब पट्टा निश्चित करण्यात आला आहे. 166 चौरस किलोमीटर प्रकल्प क्षेत्रापैकी सुमारे 122 चौरस किलोमीटर क्षेत्र जंगलांनी बनलेले आहे. प्रकल्प क्षेत्राचे उत्तरेकडील टोक बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये चांगले येते. बायोस्फिअर राखीव क्षेत्राचा सुमारे 71 चौरस किलोमीटरचा भाग राखून ठेवावा लागणार आहे. गॅलेथिया बे, लेदरबॅक कासवांसाठी घरटे बांधण्याचे एक प्रमुख ठिकाण आहे. गॅलेथिया बे वन्यजीव अभयारण्याचे घर होते. मात्र, ते अलीकडेच डिनोटिफाईड करण्यात आले.
इको टुरिझमसाठी मोठा भाग राखीव
बेटाच्या या भागात प्रकल्पाचे मध्यवर्ती घटक, आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधले जाणार आहेत. प्रकल्प क्षेत्राला लागून असलेले गॅलेथिया राष्ट्रीय उद्यान मोठय़ा प्रमाणात बफर झोनशिवाय सोडले जाणार आहे. उद्यानाला लागून असलेल्या प्रकल्प क्षेत्राचा मोठा भाग ’इको टुरिझम’साठी राखून ठेवण्यात आला आहे. मोठय़ा बांधकाम प्रकल्पांना तेथे परवानगी नसेल. परंतु उद्यानक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात बांधकाम आणि ड्रेजिंग होणार आहे. बंदर आणि विमानतळासाठी सुमारे 421 हेक्टर (4.21 चौरस किलोमीटर) जमिनीची गरज आहे.

लोकसंख्येत वाढ अपेक्षित
टाऊनशिप्सची स्थापना आणि बांधकाम यामुळे बेटाच्या लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ अपेक्षित आहे. सध्या वस्ती असलेल्या भागात सर्वात मोठा कॅम्पबेल बे आहे, ज्याची लोकसंख्या 69 टक्के आहे. 2011 च्या जनगणनेनुसार ही संख्या सुमारे 8,400 होती. तर अलीकडील अधिकृत अंदाजानुसार रहिवाशांची संख्या सुमारे 12 हजार आहे. ही संख्या 2025 पर्यंत 52 हजारपर्यंत वाढणे अपेक्षित आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर 2040 पर्यंत 1.65 लाख लोकसंख्या होईल, असे पूर्व व्यवहार्यता अहवालात नमूद केले आहे.
कार्गो ट्रान्सशिपमेंटचे प्रमुख केंद्र
ग्रेट निकोबार हे कोलंबोपासून नैर्त्रुत्येला आणि आग्नेयला सिंगापूरच्या समतुल्य अंतरावर आहे. पूर्व-पश्चिम आंतरराष्ट्रीय शिपिंग कॉरिडॉरच्या जवळ आहे. ज्यातून जगातील शिपिंग व्यापाराचा एक मोठा भाग जातो. प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कंटेनर ट्रान्सशिपमेंट टर्मिनल या मार्गावरून प्रवास करणाऱया मालवाहू जहाजांसाठी संभाव्य केंद्र बनू शकते. नीती आयोगाच्या अहवालानुसार प्रस्तावित बंदर ग्रेट निकोबारला कार्गो ट्रान्सशिपमेंटमध्ये एक प्रमुख केंद्र बनवेल.
बेटाच्या विकासाची गरज
ग्रेट निकोबारचा विकास करण्याचा प्रस्ताव प्रथम 1970 मध्ये मांडण्यात आला होता. राष्ट्रीय सुरक्षा आणि हिंदी महासागर क्षेत्राच्या एकत्रिकरणासाठी त्याचे महत्त्व वारंवार अधोरेखित केले गेले. बंगालच्या उपसागरात आणि इंडो-पॅसिफिकमध्ये चीनच्या वाढत्या दाव्याने अलीकडच्या वर्षांत बेटाचा विकास करण्याची गरज भासू लागली. मात्र, पर्यावरणीयदृष्टय़ा महत्त्वाच्या आणि नाजूक प्रदेशातील प्रस्तावित मोठय़ा पायाभूत सुविधांच्या विकासाने पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे. वृक्षाच्छादनाच्या हानीमुळे केवळ बेटावरील वनस्पती आणि प्राणीमात्रांवरच परिणाम होणार नाही तर त्यामुळे समुद्रात वाहून जाणारे आणि गाळाचे साठे वाढतील. ज्यामुळे परिसरातील प्रवाळ खडकांवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण सध्या प्रकल्पासाठी किती रीफ स्थलांतरित करावे लागेल, याचे मूल्यांकन करत आहे. याआधी मन्नारच्या आखातातून कच्छच्या आखातात कोरल रीफ यशस्वीरित्या स्थलांतरित केले आहे. लेदरबॅक कासवासाठी एक संवर्धन योजना तयार केली जात आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाची जागा कॅम्पबेल बे आणि गॅलेथिया नॅशनल पार्कच्या इको-सेन्सिटिव्ह झोनबाहेर आहे.

प्राण्यांच्या 1800 प्रजातींचे अस्तित्व
ग्रेट निकोबार हे अंदमान आणि निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील 910 चौरस किमी क्षेत्रफळ आहे. अंदमान आणि निकोबार बेटे हे पूर्व बंगालच्या उपसागरातील सुमारे 836 बेटांचे समूह आहेत. ग्रेट निकोबार बेटाच्या दक्षिणेकडील टोकावरील इंदिरा पॉइंट हा भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू आहे, जो इंडोनेशियन द्वीपसमूहाच्या उत्तरेकडील बेटापासून 150 किमीपेक्षा कमी अंतरावर आहे. यात 1,03,870 हेक्टर अद्वितीय आणि धोक्यात असलेल्या उष्णकटिबंधीय सदाहरित वन परिसंस्थेचा समावेश आहे. हे एक अतिशय समृद्ध परिसंस्थेचे घर आहे, ज्यामध्ये 650 प्रजातींच्या एंजियोस्पर्म्स, फर्न, जिम्नोस्पर्म्स, ब्रायोफाइट्सचा समावेश आहे. प्राण्यांच्या बाबतीत, 1800 पेक्षा जास्त प्रजाती आहेत, त्यापैकी काही या भागात स्थानिक आहेत.
ग्रेट निकोबार बायोस्फीअर रिझर्व्हमध्ये उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित जंगले, समुद्रसपाटीपासून 642 मीटर (माऊंट थुलियर) उंचीवर पोहोचलेल्या पर्वत रांगा आणि किनारी मैदाने यांचा समावेश असलेल्या विस्तृत परिसंस्थेचा समावेश आहे. ग्रेट निकोबार हे दोन राष्ट्रीय उद्याने, एक बायोस्फिअर रिझर्व्हचे घर आहे.
2004 च्या त्सुनामीनंतर…
या क्षेत्रात कॅम्पबेल बे नॅशनल पार्क, गॅलेथिया नॅशनल पार्क बायोस्फिअर रिझर्व्ह, ग्रेट निकोबार बायोस्फिअर रिझर्व्ह आहे. मंगोलॉईड शॉम्पेन जमाती सुमारे 200 संख्येने असून ते बायोस्फियर रिझर्व्हच्या जंगलात विशेषतः नद्या आणि नाल्यांच्या बाजूने राहतात. आणखी एक मंगोलॉईड जमात निकोबारीस ज्यांची संख्या सुमारे 300 होती, ती पश्चिम किनाऱयावर राहायची. 2004 मध्ये आलेल्या त्सुनामीनंतर पश्चिम किनाऱयावरील त्यांची वस्ती उद्ध्वस्त झाल्याने त्यांचे उत्तर किनाऱयावरील आफ्रा खाडी आणि कॅम्पबेल खाडी येथे स्थलांतर करण्यात आले.
जैव-भौगोलिक चमत्कार
ग्रेट निकोबार बेट हे अंदमान समुद्रातील एक उष्णकटिबंधीय ओएसिस आहे. 910 चौरस किलोमीटरचा हा जैव-भौगोलिक चमत्कार अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह बनविणाऱया 572 बेटांपैकी शेवटचा आहे. ऐतिहासिकदृष्टय़ा या बेटावर निकोबारेस आणि शॉम्पेन समुदायांची वस्ती होती. परंतु 1960 पासून भारतातील विविध राज्यांतील लोकांचे ग्रेट निकोबार बेटावर स्थलांतर झाल्यामुळे तिसरा विषम वसाहत करणारा समुदाय तेथे जोडला गेला.
दुसरी बाजू
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या पर्यावरण मूल्यमापन समितीपासून ते पर्यावरणशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ यांनी अनेक धोके समोर आणले आहेत. भूकंपाच्या दृष्टीने अस्थिर जमिनीच्या 149 चौरस किमीवरील टाऊनशिप विकसित करण्याच्या धोक्याचा यात समावेश आहे. असुरक्षित लेदरबॅक समुद्री कासवाच्या किनारपट्टीवरील घरटी साईटवर प्रभाव, प्लाइस्टोसीन कालखंडातील काही सर्वात प्राचीन जंगलातील सुमारे नऊ लाख झाडे नष्ट होणे, निकोबार लांब-पुच्छ मॅकाकची (लांब शेपटीचे माकड) आधीच मर्यादित असलेली संख्या धोक्यात येऊ शकते. तसेच प्रकल्पासाठी दररोज 86,600 किलोलिटर पाण्याची आवश्यकता असल्याचा अंदाज आहे, ज्यापैकी 45 हजार किलोलिटर पाणी भूपृष्ठावरील जलाशयांमधून काढलेले गोडे पाणी असेल.
‘मकाक’च्या अस्तित्वाला धोका
त्सुनामीनंतर ग्रेट निकोबार बेटावर विविध भारतीय तज्ञांनी निकोबार लांब-पुच्छ मकाक आणि त्यांच्या गुंतागुंतीच्या सामाजिक-पर्यावरणीय प्रणालींवर अभ्यास केले. त्यांची लोकसंख्या आणि संवर्धन स्थितीपासून त्यांच्या आकलनशक्ती आणि स्थानिक समुदायांशी संवाद याचाही अभ्यास केला गेला. अभ्यासातून प्रकाशित झालेले वैज्ञानिक पुरावे आणि बेटाच्या प्रस्तावित विकासामुळे असोसिएशन ऑफ इंडियन प्रिमॅटोलॉजिस्टने (एआयपी) मकाकच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली.
मकाक म्हणजे स्थानिकांसाठी देवरुप
मकाक ही वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 अंतर्गत संरक्षित शेडय़ूल 1 प्रजाती असूनही आणि जागतिक स्तरावर असुरक्षित प्रजाती असूनही तिचे मूल्य कमी केले. प्रस्तावित प्रकल्पाचा मकाकांवर होणाऱया खऱया परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी अपुरा वेळ देण्यात आला, असा आक्षेप घेण्यात आला. 2004 च्या त्सुनामीने त्यांचे अन्न असलेले जंगलाचे तुकडे नष्ट केल्यानंतर मकाकने मानवी वसाहतींमध्ये धाव घेतली. स्थानिक रहिवासी मकाकांना रामायणातील माकडे मानतात. स्थानिक हिंदू समुदाय मकाकची उपमा माकड देव, हनुमान यांच्याशी देखील करतात. ज्यामुळे ते या प्रजातींशी प्रेमाने वागतात. लँडस्केप पातळीतील बदलांमुळे मकाक आहारदेखील बदलतो. त्यांचे आरोग्य आणि पोषण प्रभावित होते. सभोवतालच्या वातावरणातील बदलामुळे आधीच मर्यादित असलेल्या मकाकच्या संख्येला धोका आहे. यामुळे प्रजनन आणि विविध जीन साखळी नष्ट होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे.
बेटावर माजी सैनिकांचेही वास्तव्य
ग्रेट निकोबार बेटावर शॉम्पेन आणि निकोबारीस आदिवासी जमातीच्या लोकांचे वास्तव्य आहे. त्याचसोबत 1970 च्या सुमारास पंजाब, महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशातील माजी सैनिक या ठिकाणी वास्तव्यास आले आहेत. या बेटावरील शॉम्पेन ही शिकार करणारी आदिवासी जमात असून जंगल आणि समुद्रावर त्यांचे जीवन अवलंबून आहे. बेटाच्या पश्चिम किनारी भागात निकोबारीस लोकांचे वास्तव्य असून ते 2004 च्या त्सुनामीनंतर पुनर्वसित झाले आहेत. सुमारे 237 शॉम्पेन आणि 1094 निकोबारीस लोकांचे 751 चौरस किलोमीटर आदिवासी रिझर्व्ह जंगलात वास्तव्य आहे. एकूण सुमारे 8 हजार पुनर्वसित या ठिकाणी असून ते शेती, बगायती आणि मासेमारी यावर अवलंबून आहेत.
संकलन ः राजेश मोंडकर, सावंतवाडी









