केंद्र सरकारच्या ‘सौभाग्य’ योजनेचे स्पृहणीय यश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पथदीप, एलईडी बल्बस् आदींच्या उपयोगात गेल्या आठ वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. त्यांचा उपयोग त्यापूर्वीच्या तुलनेत तब्बल 43 टक्क्यांनी वाढला आहे, असे इस्रोच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. इस्रोच्या उपग्रहांनी अवकाशातून रात्रीच्या वेळी केलेल्या प्रकाशमानतेच्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे. हे केंद्र सरकारच्या विविध योजनांचे यश असल्याचे बोलले जात आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात 2014 मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर ‘प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना साकारण्यात आली. तसेच एलईडी बल्बस् देण्याची उज्ज्वला योजना आणि सौभाग्य योजना आदी योजनांच्या माध्यमातून गेल्या साडेआठ वर्षांमध्ये 3 कोटींहून अधिक घरांचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे याच कालावधीत 50 हजारहून अधिक किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग निर्माण करण्यात आले आहेत. या महामार्गांवर पथदीप मोठय़ा प्रमाणात बसविण्यात आले असून त्यामुळे पथदीपांची संख्याही वाढली आहे.
सर्वेक्षणाचे महत्व
अवकाशातून असे सर्वेक्षण करण्याची पद्धत जवळपास प्रत्येक देशाकडून अवलंबिण्यात येते. या सर्वेक्षणात रात्रीच्या वेळी त्या देशातील प्रकाशमानता उपग्रहांच्या माध्यमातून मापण्यात येते. त्यावरुन विजेचा उपयोग मार्ग आणि घरांसाठी किती प्रमाणात वाढला हे स्पष्टपणे दिसून येते. या प्रकाशमानतेचा संबंध आर्थिक प्रगतीशी जवळचा आहे. देश आर्थिकदृष्टय़ा प्रबळ नसेल तर तो रात्रीच्या वेळी इतक्या वीजेचा उपयोग करु शकत नाही, असे गृहितक यामागे आहे.
43 टक्क्यांची वाढ
रात्रीच्या प्रकाशमानतेत (ल्युमिनॉसिटी) देशात गेल्या साडेआठ वर्षांत 43 ते 50 टक्क्यांची वाढ त्यापूर्वीच्या तुलनेत झाली आहे, असे दिसून येते. याचाच अर्थ असा की, पथदीप आणि रात्री घरात लागणारे दिवे यांच्या उपयोगात 43 ते 50 टक्के वाढ झाली आहे. देशात विजेचे उत्पादन पुरेसे होत आहे, याचे हे द्योतक आहे. रात्रीच्या प्रकाशमानतेत 2014 ते 2020 या कालावधीत सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. तर 2021 ते 2022 या कोरोना उदेकाच्या काळात यात 5 टक्क्यांची घट झाली होती. तथापि, आता गेल्या सहा महिन्यांमध्ये पुन्हा रात्रीची प्रकाशमानता वाढू लागली असून मार्गही उजळले आहेत.
बिहारमध्ये सर्वाधिक वाढ
बिहारमध्ये संजद आणि भाजपच्या युतीच्या सरकारच्या काळात उज्ज्वला आणि सौभाग्य योजनांचे क्रियान्वयन मोठय़ा प्रमाणात करण्यात आले होते. त्यामुळे एलईडी बल्बस् आणि पथदीप यांच्या प्रमाणात या राज्यात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्याखालोखाल मणिपूर आणि लडाख येथे रात्रीची प्रकाशमानता वाढली आहे. चंदीगढ येथील वाढ 12 टक्के आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.









