सुमारे 30 हून अधिक तलावांची खोदाई : इतर पर्यायी मार्गही निवडण्यासाठी अधिकाऱयांची धडपड
प्रतिनिधी /बेळगाव
मागील दोन ते तीन वर्षांपासून पाऊस बऱयापैकी झाला आहे. जमिनीतील खालावलेली पाणी पातळी वाढविण्यासाठी तालुका पंचायतमधून मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत. पाणी पातळीचा पोत वाढविण्याच्या दृष्टिकोनातून अनेक तलाव तसेच छोटेखानी धरणांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पाण्याचा योग्य वापर करण्यावर निर्बंध घालण्याचे प्रयत्न होत आहेत.
काही वर्षांपूर्वी कमी पावसामुळे तलाव कोरडीच पडू लागली. त्यामुळे अनेक गावांत विविध योजनांमधून तलावांच्या खोदाईचे काम हाती घेण्यात आले. याला चांगला प्रतिसाद मिळू लागला असून गावांमधील नागरिकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. मात्र इतके काम होऊनदेखील तलावात पाणी साठण्याचे प्रकार कमी झाले होते. मात्र मागील दोन वर्षांपासून तलावांमध्ये पाणीसाठा अधिक होत असल्याचे दिसून येत आहे.
तलावांत पाणीसाठा करून त्याचा फायदा शेतकऱयांना व्हावा व जमिनीतील पाण्याचा पोत वाढविण्यासाठी प्रशासनाने ही क्लृप्ती लढविली आहे. अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात यश येत आहे. जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांतील अनेक गावांमध्ये रोजगार हमी योजना व आमदार फंडातून तलाव खोदाईची कामे हाती घेण्यात आली असली तरी पाणीसाठा होत नसल्याने अडचण निर्माण होत होती. मात्र दोन वर्षांपासून पावसाने चांगली साथ दिल्याने जमिनीतील पाण्याचा पोत वाढत असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
नागरिकांना तलाव खोदाईचे काम मिळत असून रोजगारही मिळत आहेत. ज्या कामासाठी खोदाई केली आहे तेच काम होत नसल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. हे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू असले तरी आता याला मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सध्या जमिनीतील पाणी पातळीत अजूनही घट होत आहे. ती पाणी पातळी वाढविण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामध्येच एक म्हणजे तलाव खोदाई व इतर कामे उद्योग खात्री योजनेंतर्गत राबविण्यात येत आहेत. त्यामुळे बेरोजगारांना रोजगार तसेच पाणीसाठा वाढविण्यासही मदत होत आहे.
शेतकरी-नागरिकांसाठी तलाव लाभदायक
गावांमध्ये असणारे तलाव शेतकरी व नागरिकांसाठी लाभदायक ठरतात. पावसाळ्यामध्ये तलाव तुडुंब भरले की आजुबाजुच्या परिसरातील पिकांना पाणी देण्यासाठी व जनावरांना पाणी पाजण्यासाठी या तलावांचा चांगला उपयोग होतो. बेळगाव जिल्हय़ातील सर्रास गावांमध्ये तलाव आहेत. मात्र यापैकी सर्रास तलावांमध्ये यावर्षी बऱयापैकी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पावसानंतर महिना दोन महिन्यातच ते पाणी आटत आहे. त्यामुळे नागरिक व शेतकऱयांना कोरडय़ा पडलेल्या तलावांऐवजी दुरवरून पाणी आणून पिकांना व जनावरांना पाणी पाजवावे लागते. आता यासाठी बाराही महिने पाणी तलावांमध्ये थांबण्यासाठी पाणी पातळीच वाढविणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
जिल्हा पंचायत, तालुका पंचायत व ग्राम पंचायतीच्या माध्यमातून तलाव खोदाईचे काम हाती घेतले जात आहे. यावर्षी तलाव खोदाई झाल्यामुळे मान्सूनमध्ये जोराचा पाऊस झाल्यास तलाव तुडूंब भरणार आहेत. त्यामुळे शेतकऱयांची चांगली सोय होणार आहे. याचबरोबर पाणी पातळी वाढल्यास पर्यावरणही अबाधित राहण्यास मदत होते. त्यामुळेच तलावांच्या बाजुनेही वृक्षलागवड करण्यात येते. परिणामी याचा उपयोग होत आहे. अजूनही जमिनीमध्ये पाणीसाठा व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
शेतकरी वर्गातूनही समाधान
उद्योग खात्री योजनेतून 5 ते 6 फुटांपर्यंत तलावांची खोदाई करण्यात येते. तर काही ठिकाणी जेसीबी लावून खोदाई केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही तलावांमध्ये पाणी, गाळ व जलपर्णी वाढल्यामुळे खोदाई करणे गरजेचे होते. मात्र तलावांमध्ये पाणी असल्याकारणाने खोदाई करताना अडचणी निर्माण होत होत्या. आता पाणी नसल्याने सर्वच गावांमधील तलावांमध्ये खोदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातूनही समाधान व्यक्त करण्यात येत असले तरी पाणी पातळीत वाढ होण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची धडपड अधिकारी करू लागले आहेत.









