मुख्यमंत्री : गोवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या नूतन अध्यक्षपदी श्रीनिवास धेंपो, वार्षिक सभेत निवड
पणजी : गोवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे फार मोठे कार्य आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेतल्यास औद्योगिक क्षेत्रातील समस्या सोडविण्यात जीसीसीआयचे खूप मोठे योगदान लाभले आहे. त्यामुळए सुमारे 70 टक्के औद्योगिक समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नूतन अध्यक्षपदी निवड झालेले उद्योजक श्रीनिवास धेंपो यांनी औद्योगिक संघटनेला व कार्याला सतत पाठिंबा द्यावा. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजमुळे औद्योगिक क्षेत्रात चांगले कार्य आपणास पहावयास मिळते, अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जीसीसीआयचा गौरव केला. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या 115व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, जीसीसीआयचे संचालक संजय आणोणकर, उद्योजक श्रीनिवास धेंपो, मावळते अध्यक्ष राल्फ डिसौझा, मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेडच्या व्यवस्थापक संचालक श्रीमती अमीरा शाह उपस्थित होते.
हॉटेल सीदाद दी गोवा या ठिकाणी घेण्यात आलेल्या सभेत राल्फ ड़िसौझा यांच्याकडून जीसीसीआयचे नूतन अध्यक्ष म्हणून श्रीनिवास धेंपो यांनी पदभार स्वीकारला. धेंपो यांनी सांगितले की, जीसीसीआयमध्ये आर्थिक सुधारणा, पायाभूत सुविधांचा विकास आणि गोव्यात अधिकाधिक उद्योगांसाठी माझे प्रयत्न राहतील. धेंपो घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे जीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी आणखी वाढली असल्याचे श्रीनिवास धेंपो यांनी जीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सांगितले. मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अमीरा शाह यांनी सांगितले की, 7500 कोटींच्या आरोग्य सेवा कंपनीचे नेतृत्व करणारी मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेडकडे पाहिले जाते. महिला सक्षमीकरणाचे ज्वलंत उदाहरण म्हणून आमच्याकडे पाहिले जाते. मेट्रोपोलिस हेल्थकेअर हे आता गोव्यातील आरोग्य सेगमेंटमध्ये गुंतवणूक करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे संचालक संजय आमोणकर यांनी विविध प्रकल्पांची व योजनांची माहिती देत जीसीसीआयच्या कार्यावर प्रकाश टाकला.
फसव्या प्रचाराला बळी पडू नका…
उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, दाबोळी विमानतळावर हवाई वाहतूक वाढली असतानाही याबाबत फसवे प्रचार केला जात आहे. खोट्या व फसव्या भूलथापांना जनतेने बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. गोव्यासाठी उद्योग धोरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व मंत्री आणि सचिवांनी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजसोबत तिमाही आधारावर सतत संवाद साधणे गरजेचे आहे. जीसीसीआयची मदत घेऊन उद्योगपतींनी पोर्टलवर शिकाऊ उमेदवारी आवश्यकता व माहिती अपलोड करावी. आपल्या उद्योगात प्रशिक्षित तऊणांचा जास्तीत जास्त सहभाग करून घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.









