जुने गोवे : सशक्त भारत आणि स्वच्छ भारत या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी सुरू केलेल्या उपक्रमांची अंमलबजावणी देशात सगळीकडे चालू असुन जुने गोवे पोलीस स्थानकाच्या वतीने गेले 28 दिवस चाललेल्या ’ फिट इंडिया ’ उपक्रम त्याचाच एक भाग आहे. ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल जुने गोवे पोलीसांचे अभिनंदन करतो, असे प्रतिपादन गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले. कायदा सुव्यवस्था राखण्याचे पोलिसांचे महत्त्वाचे काम सांभाळून 28 दिवस जुने गोवे पोलीस क्षेत्रातील विविध भागात फिट इंडिया चळवळ यशस्वी रित्या चालविल्या बद्दल जुने गोवे पोलीस स्थानकाचे निरीक्षक व त्यांचे सहकारी तसेच त्यांना या उपक्रमात मार्गदर्शन करणारे आयजीपी व एसपी हे खरोखरच अभिनंदनास पात्र आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. या उपक्रमाच्या सांगता सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी सांगता सोहळ्यात सहकार्य करणारे कुंभारजुवे मतदारसंघाचे आमदार श्री राजेश फळदेसाई, बोम जिझस बासिलीका चर्चचे फादर पेट्रीसीओ, से केथेड्रेल चर्चचे फादर रोजारिओ, आयजीपी, एसपी, जुने गोवे पोलीस स्थानकाचे निरीक्षक सतिश पडवळकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.जुने गोवे पोलीसांकडून पोलिस स्थानकाच्या हद्दीतील मेरशी,चिंबल, सांताक्रूझ, करमळी खोर्ली तिसवाडी, जुने गोवे, चोडण,दिवाडी,वाशी,सांत इस्तेव,व कुंभारजुवें या गावात 1 ते 28 फेब्रुवारीपर्यंत हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात व्यायाम, योगा, प्राणायाम, अंमलीपदार्थ सेवन, रस्ते अपघात कसे टाळायचे, अल्पवयीनानी वाहनं कां चालवू नये याबाबत जनजागृती केली. आपल्या मतदार संघातील बहुतेक भागात जुने गोवे पोलीसांकडून हा उपक्रम राबविण्यात आल्याने आपण त्यांचा आभारी आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांना आपले नेहमीच सहकार्य असेल असे कुंभारजुवें मतदारसंघाचे आमदार राजेश फळदेसाई आपल्या भाषणात म्हणाले. या समारोप सोहळ्यात विविध व्यायाम प्रकारांच्या स्पर्धा घेऊन विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. या उपक्रमात धावण्याच्या वेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत अकस्मात थांबल्यावर विद्यार्थ्यांनी हस्तांदोलन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना गराडा घातला, मुख्यमंत्र्यांनी सुध्दा मोठ्या आनंदाने काही वेळ विद्यार्थ्यांशी गराड्यातच हस्तांदोलन केले त्यामुळे विद्यार्थ्यी खुष झाल्याचे दिसत होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की,असा उपक्रम प्रत्येक पोलिस स्थानकाच्या हद्दीतील राबविण्यात येतील तसेच अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक वर्षी राबविण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील.आजच्या या समारोप सोहळ्यात विद्यार्थ्यां बरोबरच पालक , शिक्षक, जेष्ठ नागरिक, सरपंच – उपसरपंच, पंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. निरीक्षक सतीश पडवळकर यांनी सर्वांचे आभार मानले. सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.









