कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. अध्यक्षांना निवेदन : नदीजवळून जाणाऱ्या रस्त्याचीही दुरुस्ती करण्याची मागणी
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
येथील मरगाईनगरमधील कल्लाप्पा पवार यांच्या घरापासून कामतकट्टा शिवाराकडे जाणाऱ्या तसेच मार्कंडेय नदीजवळील सार्वजनिक विहिरींकडे जाणाऱ्या गाडीमार्गाचे खडीकरण करून शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रा. पं. अध्यक्षा कौसरजहाँ सय्यद व ग्रा. पं. सदस्या भारता पाटील यांच्याकडे करण्यात आली. यासंबंधिचे निवेदन विठ्ठल कोळी, सदस्य व्यंकट पाटील, कल्लाप्पा पवार, मल्लाप्पा पाटील, नागेश मासेकर आदींच्या हस्ते देण्यात आले. कल्लाप्पा पवार यांच्या घरापासून सदर बैलगाडी मार्गामध्ये पावसाळ्यात गुडघाभर चिखल होत असतो. शेतकरी वर्गाला सदर चिखलाच्या वाटेतून वाट शोधत शेताकडे जावे लागते. पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांची दुचाकी वाहने शेतापर्यंत गेल्यास जनावरांना हिरवा चारा आणणे, खताचे पोते नेणे अवघड होते. हा रस्ता सुरळीत झाल्यास सोयीस्कर होणार आहे. परंतु तसे नसल्यामुळे शेतकरी वर्गाला चारा डोकीवरून आणावे लागत आहे. चिखलातून पायी चालत जाताना चिखलामधून पाय घसरून पडून अनेक शेतकरी जखमी होण्याच्याही घटना घडत आहेत. त्यामुळे सदर दोन्ही रस्त्यांचे पक्के खडीकरण होणे गरजेचे आहे, अशी निवेदनातून मागणी करण्यात आली आहे.
कालव्याची माती हटवा
नदीकाठावर खोदलेल्या सार्वजनिक विहिरीकडे जाणाऱ्या गाडीमार्गाच्या बाजूने गावचे सांडपाणी नदीला मिळण्यासाठी खोदाई केलेल्या कालव्यातील गाळमाती मार्गाच्या बाजूला टाकली आहे. यामुळेही पावसाळ्यात सदर गाडीमार्गावर दलदल निर्माण होत आहे. ही गाळमाती त्वरित हटवून गाडीमार्ग मोकळा करण्याचीही निवेदनात मागणी केली आहे. निवेदनाचा स्विकार करून गाडीमार्गांचे उन्हाळ्यामध्ये खडीकरण करून देण्याचे आश्वासन ग्रा. पं. अध्यक्षांनी उपस्थित शेतकरी वर्गाला दिले.









