कोल्हापूर :
कोल्हापूर शहरातील कसबा बावडा परिसरात कचरा उठाव आणि स्वच्छतेची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. महापालिकेची यंत्रणा सुस्तावल्याने बावड्यातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा आणि रोड डिव्हायडरच्या शेजारी खरमाती आणि कच्रयाचे ढीग साचले आहेत. मुख्य रस्त्यावर असलेली ही अस्वच्छता नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करत असून, याबाबत वारंवार तक्रारी करूनही आरोग्य विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे.
कसबा बावडा मुख्य रस्त्यावरील एसपी ऑफिस चौक ते शुगर मिल कॉर्नर या सुमारे दोन किलोमीटरच्या मुख्य रस्त्यावर सध्या धूळ आणि कच्रयाचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या दुतर्फा आणि मध्यभागी असलेल्या रोड डिव्हायडरच्या शेजारी साचलेली खरमाती वाहनांच्या ये–जा आणि व्रायामुळे हवेत मिसळत आहे. यामुळे परिसरात धुळीकणांचे प्रमाण वाढले असून, वाहनचालकांना आणि रहिवाशांना श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ आणि चुरचुरणे यांसारख्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषत? सकाळी आणि संध्याकाळी वाहनांची वर्दळ जास्त असताना ही समस्या अधिकच तीव्र होत आहे.
स्थानिक नागरिकांनी याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे अनेकदा तक्रारी नोंदवल्या आहेत. “आम्ही सतत तक्रार करतो, पण कचरा उचलला जात नाही. रस्त्यावरची खरमाती तर कधीच साफ झालेली नाही,“ अशी खंत एका रहिवाशाने व्यक्त केली. दुस्रया एका नागरिकाने सांगितले की, “धूळ आणि कच्रयामुळे मुलांना आणि ज्येष्ठांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.“ या परिस्थितीमुळे परिसरातील हवा प्रदूषित होत असून, स्वच्छतेच्या दृष्टीने कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता, महापालिकेच्या सुस्त यंत्रणेला जागे करण्यासाठी प्रशासकांना पुन्हा कठोर कारवाई करावी लागेल का, असा सवाल उपस्थित होत आहे. जोपर्यंत ठोस उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत कसबा बावड्यातील नागरिकांना अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्यांशी झुंजावे लागणार आहे. आता प्रशासन कधी जागे होणार आणि ही समस्या कधी सुटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
महापालिकेच्या आरोग्य विभागाला नियमित स्वच्छता मोहीम राबवण्याची आणि कचरा उठावाची जबाबदारी असूनही, कसबा बावडा परिसरात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी अनेकवेळा कचरा उठावाच्या दयनीय स्थितीवर नाराजी व्यक्त करत अधिक्रायांना रोज फिरती आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या सूचनांचे पालन होत नसल्याचे या परिस्थितीवरून स्पष्ट होते. स्थानिकांनी आता मागणी केली आहे की, महापालिकेने या भागात नियमित स्वच्छता मोहीम राबवावी आणि खरमाती तसेच कचरा हटवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत.








