अध्याय एकोणतिसावा
उद्धव भगवंताना म्हणाला, तुझी निस्वार्थ सेवा करून तुझे भक्त सुखसंपन्न आणि अतिसमर्थ होतात. ते संसारात असून विरक्त असतात कारण तुझी सेवा केल्यामुळे संसारातून मिळणाऱ्या सुखापेक्षा कितीतरी उच्च कोटीच्या आत्मसुखाचा त्यांनी अनुभव घेतलेला असतो. हा आत्मसुखाचा अनुभव भक्तांना मिळण्यासाठी तू भगवदगीतेच्या दहाव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे, तुझी सेवा करणाऱ्या भक्तांना तू बुद्धियोग प्रदान करतोस. त्यामुळे झालेल्या आत्मज्ञानाने त्यांचा अज्ञानरुपी अंधार नाहीसा होतो.
भक्तांना तुझ्या चरणांची धूळ वंदनीय आहेच पण तीच चरणधूळ पृथु, जनक ह्या राजामहाराजांना सुद्धा वंदनीय आहे. हे राजे तुझी एव्हढी सेवा करतात की, त्यामुळे ते इंद्रादिक देवांनासुद्धा वंदनीय होतात. एव्हढेच नव्हे तर रिद्धी आणि सिद्धी म्हणजे संपत्ती आणि ते म्हणतील तसं घडून येण्याची शक्तीसुद्धा त्यांच्या अंकित होते. अनंत काळपर्यंत तप करूनसुद्धा ज्या सिद्धी हाताशी लागत नाहीत त्या सिद्धी भक्तांना मात्र सहजी प्राप्त होतात.
विशेष म्हणजे कोणतेही योगसाधन न करता केवळ एकचित्ताने तुझी भक्ती करणाऱ्या भक्ताला सर्व सिद्धी सहजभावाने शरण येतात. म्हणून जे योगी योगसाधनेबरोबर तुझी भक्ती करतात ते योगशास्त्रात लवकर प्रवीण होतात. याप्रमाणे तू भक्तांवर अनंत उपकार करत असताना भक्तही तुझ्या उपकारांची परतफेड म्हणजे तुझ्यावर प्रत्युपकार करण्याच्या उद्देशाने स्वत: तुझ्या चरणी सादर समर्पित होतात.
हे समर्पण किती परिपूर्ण असते, हे समजावून सांगण्यासाठी दाखला देताना नाथ महाराज, बिंब प्रतिबिंबाचा आणि घटाकाश व महदाकशाचा संदर्भ देतात. ते असे म्हणतात की, देव हे बिंबरूप असून अनन्य भक्त त्यांचे प्रतिबिंब असतो. त्यामुळे भक्ताचे संपूर्ण समर्पण म्हणजे जणूकाही प्रतिबिंब बिंबात मिसळून गेल्यासारखे असते.
दुसरी उपमा नाथ महाराज अशी देतात की, माठ फुटल्यावर माठातले आकाश महदाकशात मिसळून गेल्याने माठातल्या आकाशाचे स्वतंत्र अस्तित्व उरत नाही त्याप्रमाणे भक्त तुझ्या चरणी समर्पित झाला की त्याचे स्वत:चे अस्तित्व उरत नाही. तू जरी सगळ्यांच्यावर उपकार करत असलास तरी काही लोक प्रत्युपकार म्हणून तुझ्या चरणी समर्पित होत नाहीत कारण स्वत:ला तुझ्या चरणी समर्पित करण्याचे महत्त्वच त्यांना कळत नाही. मग तुझ्या चरणी समर्पित होण्याचे सोडून हे लोक स्वत:च्या बुद्धीने योगयाग इत्यादि उपाय करून थकून जातात पण त्यांच्या हातून तुझ्या उपकारांची परतफेड म्हणून प्रत्युपकार काही त्यांच्या हातून घडत नाही.
इतर पुष्कळ साधने ते ह्यासाठी करतात परंतु तुझ्या डोंगराएव्हढ्या उपकारांच्या तुलनेत प्रत्युपकार म्हणून त्यांचे महत्त्व जरासुद्धा असत नाही. तुझे भक्तांच्यावर थोर उपकार आहेत ते कोणते म्हणून विचारशील तर तुझ्या भक्तांचे पाप हे कृपाळा तू अंतरबाह्य निर्दाळून टाकतोस. भक्तांच्या अंतरात वास करून तसेच बाह्य रुपात सद्गुरू होऊन तू हे कार्य करतोस. दोन्ही रुपात करुणाकर होऊन तू भक्तांच्या डोक्यावरचा पापाचा भार उतरवतोस अशा तऱ्हेने भक्तांना भवसमुद्राच्या पार करून देऊन निर्धाराने पुढे घेऊन जातोस. ह्या नीजनिर्धारामुळे भक्तांचे मी तू पण सहज नाहीसे होते. तसेच त्यांचा देहाभिमानही नष्ट होतो. असे झाले की त्यांचे जन्म, म्हातारपण आणि मरण संपून जाते. त्यांचे जन्मजरामरण नाहीसे झाल्याने ते सहजी आनंदघन होतात. मनुष्याची आयुष्यभर कायम टिकणारा आनंद मिळवण्यासाठी धडपड चालू असते. जे तुझी भक्ती करून स्वत:ला तुझ्या चरणी समर्पित होतात त्यांची ही धडपड संपुष्टात येऊन ते स्वत:च आनंदघन होतात. म्हणून म्हणतो, तुझ्या कृपेने तू भक्तांवर कोटी कोटी उपकार करतोस आणि तुझी स्वरूपस्थिती भक्तांना प्राप्त करून देतोस ह्यामुळेच तू स्वामी श्रीपती तिन्ही लोकात वंद्य झालेला आहेस.
क्रमश:








