वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आदित्य बिर्ला समूहाची कंपनी ग्रेसिम इंडस्ट्रीजने रंग उत्पादन क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये कंपनी 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. बाजारातील आघाडीवरची कंपनी एशियन पेंटस यांच्यासोबत ही कंपनी नव्याने स्पर्धा करण्यासाठी उतरणार आहे.
संचालक मंडळाची मंजुरी
या आधी रंग उत्पादन क्षेत्रामध्ये सिमेंट क्षेत्रातील कंपनी जेएसडब्लूनेही उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या तयारीला वेग दिला आहे. नुकत्याच झालेल्या संचालकांच्या बैठकीमध्ये ग्रेसिम इंडस्ट्रिजने रंग उत्पादनात उतरण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे रंग व्यवसायामध्ये उतरण्याचा कंपनीचा मार्ग मोकळा झाला आहे. बाजारातील रंगांची मागणी व एकंदर बाजारातील आढावा घेऊन रंग उत्पादने सादर करण्याची योजना आगामी काळामध्ये राबविली जाणार आहे.
कधी उत्पादन सुरू
बाजारातील एकंदर स्पर्धा पाहून त्याप्रमाणे उत्पादने बाजारात उतरवण्याचा इरादा कंपनीचा असून आर्थिक वर्ष 2024 पासून रंग उत्पादनाला सुरुवात केली जाणार आहे. मागच्या वषी पाच हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह रंग व्यवसायामध्ये उतरण्याची घोषणा कंपनीने केली होती. आता कंपनीने या व्यवसायामध्ये आणखी पाच हजार कोटी रुपयांची भर घालण्याचा निर्णय नव्याने घेतला आहे. गृहसजावटीच्या रंगाची वाढती मागणी लक्षात घेऊन यामध्ये आपला वाटा अधिकाधिक वाढविण्यासाठी कंपनीचे प्रयत्न पुढील काळात असणार आहेत.









