शेतकऱ्यांकडून पुढील हंगामासाठी काडी तयार करण्याचे काम सुरू
सोन्याळ : जत तालुक्यातील विठ्ठलवाडी व उमदी परिसरात गेल्या आठवडाभरात सातत्याने सुरू असलेल्या पावसाने वातावरणात आर्द्रता वाढल्याने द्राक्ष पिकांवर डाऊनी व करपा या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे आधीच चिंतेत असलेला शेतकरी आणखी अडचणीत आला आहे.
अशातच मंगळवार २० मे रोजी उन्हाळ्याच्या तोंडावर ढगफुटीसदृश झालेल्या अवकाळीने शेतकऱ्यांच्या संकटात भर टाकली. या पावसामुळे द्राक्षबागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या शेतकऱ्यांकडून पुढील हंगामासाठी काडी तयार करण्याचे काम सुरू आहे.
अनेक बागांमध्ये कोवळी पाने फुटलेली असून, नव्याने तयार होत असलेल्या काड्या जोमात आहेत. मात्र अचानक आलेल्या वादळी द्मयासह जोरदार पावसामुळे कोवळी पाने फाटून गेली, तसेच नाजूक काड्या मोडून जमिनीवर पडल्या आहेत. द्राक्षबागेची निगा राखण्यासाठी शेतकयांनी उन्हाळ्यात विशेष काळजी घेतली होती. पाण्याचा ताण, कीड-रोग नियंत्रणासाठी वेळेवर फवारणी आणि देखभाल केली होती. मात्र नैसर्गिक आपत्तीकडे शेतक्रयांचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी कृषी विभाग व मसूल प्रशासनाने नुकसानग्रस्त बागांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे तालुक्यातील अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना शासनाच्या तात्काळ मदतीची गरज आहे.
वाऱ्याचा तुफान वेग
दरम्यान सोन्याळ, माडग्याळ, लकडेवाडी, सनमडी व उटगी परिसरात आज सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास अचानक प्रचंड वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर तुलनेत कमी असला तरी वाऱ्याचा वेग अत्यंत भयंकर होता. यामुळे परिसरातील दुर्मिळ होत असलेली शेताच्या बांधावरील आंब्याच्या झाडातील देशी आंबे गळून पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
विद्युत पोल उखडले, तारा तुटल्या सायंकाळी जत पूर्वभागात बहुतांश गावांत वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि विद्युत पोल उखडून पडले आहेत. तारा तुटल्या आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून, नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागणार आहे. काही भागांतील पत्र्याची घरे उद्ध्वस्त झाली असून पत्रे उडून जाऊन शेजारील शेतांमध्ये विखुरले आहेत.
याशिवाय, शेतात बसवलेल्या सौरऊर्जेच्या प्लेट्स वाऱ्याच्या तडाख्याने उडून गेल्या किंवा तुटून पडल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जनावरांच्या गोठ्यांचेही नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
प्रशासनाने तातडीने पंचनाम्याचे आदेश देऊन मदत कार्य सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाऱ्याचा जोर इतका होता की परिसरातील लोक भयभीत झाले होते. उमदी, विठ्ठलवाडी, बोर्गी, बालगाव, हळळी संख अंकलगी परिसरात मध्यम ते हलका पाऊस बरसला आहे. अवकाळी पावसाने चांगलाच जोर लावला आहे.
आजच्या वादळी वाऱ्यामुळे सोन्याळ येथील रामण्णा निंगप्पा सनाळे यांच्या शेतामध्ये बसवलेले सौर प्लांट उखडून पडल्याने नुकसान झाले आहे. सोन्याळ गावठाण हद्दीतील विद्युत पोलवर झाडे उन्मळून पडल्याने तारा तुटल्या आहेत. वीज मंडळाकडून तत्परतेने पोल उभा करुन आणि काही ठिकाणी तुटलेल्या तारा जोडून वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.








