तासगाव :
तासगांव तालुक्यातील धुळगांव येथील एका द्राक्षबागायतदारांची विश्वास संपादन करून द्राक्षे खरेदी करून त्याचे पैसे न देता २ लाख ९५ हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादी वरून दोघा व्यापाऱ्यांच्या विरूध्द तासगांव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रज्जाक रमजान मुजावर (रा. धुळगांव, ता. तासगांव) यांनी मोहम्मद सौद मुख्तार अहमद अन्सारी (रा.एस एसन १३३ गल्ली नं.०१ रऊनकाबाद, मोलगा, जि. नाशिक) व जियाऊऊर्रहमान रियाज अहमंद (रा.घर नं.४६७ गल्ली नं.०३ गुरूवार वार्ड, बेलबाग जि. नाशिक) यांच्या विरूध्द फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फेब्रुवारी २०२१ मध्ये वरील दोन व्यापारी यांनी संगनमत करून रज्जाक यांच्या द्राक्षबागेतील द्राक्षे खरेदी केली. प्रारंभी खरेदी केलेल्या द्राक्षांची काही रक्कम फिर्यादी यांना दिली. त्यामुळे फिर्यादी यांचा विश्वास संपादन झाला. त्यांनी उर्वरित द्राक्षे त्यांना विक्री केली. या द्राक्षांचे २ लाख ९५ हजार रूपये न देता फिर्यादींची आर्थिक फसवणूक केली आहे.
वारंवार मागणी करून संबधित व्यापारी द्राक्षांचे २ लाख ९५ हजार रूपये देत नसल्याने फिर्यादी यांची आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली व तद्नंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा व्यापाऱ्यांच्या विरूध्द तासगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.








