प्रतिनिधी,कोल्हापूर
Chandrakant Patil News : करवीरनगर वाचन मंदिर स्थापनेपासून आजतागायत ज्ञानदानाचे कार्य करीत आहे.राज्यातील अव्वल वाचनालय म्हणून ओळख असून, सर्व प्रकारचे ग्रंथ येथे उपलब्ध आहेत.ज्या वाचनालयाला शंभर वर्षे पूर्ण झाली त्यांना पुस्तक विक्रीची परवानगी दिली आहे.परंतू आता ज्या सार्वजनिक वाचनालयाला 50 वर्षे पूर्ण त्यांना 3 लाख व 75 वर्षे पूर्ण करणाऱ्या वाचनालयाला 5 लाख रुपये अनुदान देणार आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
करवीर नगर वाचन मंदिरमधीन विस्तारीत वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर विभाग संघ चालक प्रतापसिंह कुलकर्णी-,करवीर नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार जोशी ,सार्वजनिक वाचनालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.शंभर आणि पंचहत्तर वर्षे पूर्ण झालेल्या सार्वजनिक ग्रंथालयाच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला.
मंत्री पाटील म्हणाले, करवीरनगर वाचन मंदिर 173 वर्षाची जुनी संस्था आहे.ज्याप्रमाणे राजकीय पक्षाचे तुकडे झालेले नाहीत, त्याप्रमाणे इतक्या वर्षात करवीर नगर वाचन मंदिरचे तुकडे झालेले नाहीत,असा टोलाही नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला मंत्री पाटील यांनी लगावला.माझी पत्नी अंजली या वाचनालयात अभ्यास करीत होती.त्यामुळे या वाचनालयाविषयी मला आपुलकीची भावना आहे.वाचनालयाला अनुदान देण्यासाठी सरकारला भरपूर मर्यादा येतात,तरीही मी वाचनालयांना चांगले अनुदान देण्याचा प्रयत्न केला. मी डॉ.रघुवीर ग्रंथालयाचे ग्रंथपाल म्हणून काम केले आहे.त्यामुळे मला वाचनालयाच्या अडचणी माहित आहेत.वाचनालयाचे अनुदान वाढवले पाहिजे,या मतावर मी सहमत आहे.
करवीर नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यवाह डॉ.आशुतोष देशपांडे यांनी प्रास्ताविक केले.माहेश्वरी गोखले यांनी सूत्रसंचालन केले.अश्विनी वळिवडकेकर यांनी आभार मानले.यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर,दीपक गाडवे,नंदकुमार मराठे,अनिल वेल्हाळ,डॉ. रमेश जाधव,अॅङ केदार मुनीश्वर,मनिषा शेणई आदी उपस्थित होते.
स्टुडिओ उभारण्यासाठी निधी देऊ
पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटने दुर्मीळ पुस्तके, दुर्मीळ ऑडिओ क्लिप असलेला स्टुडिओ उभारला आहे. याच धर्तीवर करवीर नगर वाचन मंदिरने स्टुडिओ उभारावा, त्यासाठी लागणारा निधी देऊ, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली. जी पुस्तके वाचनालयात नाहीत त्याची यादी करा, ती उपलब्ध करून देऊ, असे सांगत त्यांनी नव्या इमारतीत पुस्तक विक्री केंद्र सुरू करा, खालच्या इमारतीत महिला बचत गटांच्या स्टॉलसाठी जागा दिल्यास उत्पन्नही मिळेल, शिवाय बचत गटांनाही त्याचा लाभ होईल, असा सुचविला.
राज्याला 470 कोटी मिळणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रंथालयांना पाच हजार कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. यातील 470 कोटी महाराष्ट्र राज्याला मिळणार आहेत. यातून प्रत्येक ग्रंथालयाला 4 लाख रुपये मिळतील, असेही पाटील यांनी सांगितले. जिल्हा नियोजनच्या निधीतून पुस्तके खरेदी करण्यासाठी वाचनालयांना निधी मिळावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.