कणकुंबी : खानापूर तालुक्मयाच्या पश्चिम भागात असलेल्या पारवाड गावाला मोबाईल टॉवरची सोय नसल्याने मोबाईलधारकांची गैरसोय होत आहे. नेटवर्कसाठी कणकुंबी किंवा सुरल येथे जाऊन संपर्क साधावा लागत असल्याने पारवाड गावात मोबाईल टॉवर त्वरित मंजूर करावा, अशा मागणीचे निवेदन पारवाड ग्रामस्थांनी तालुक्मयाच्या आमदार अंजली निंबाळकर यांना नुकतेच दिले.
निवेदनात म्हटले आहे की, पारवाड गावच्या परिसरात कोणत्याही कंपनीचे नेटवर्क नसल्याने रात्री अपरात्री रुग्णांसाठी ऍम्बुलन्स बोलावण्यासाठी तसेच मदतीसाठी संपर्क साधने किंवा इतर कामांसाठी फोनवरून संपर्क साधने शक्मय नसल्याने पारवाड गावातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करताना जंगलात उंच ठिकाणी जाऊन किंवा झाडावर चढून नेटवर्कची जागा शोधावी लागत आहे. मोबाईल सेवा अतिशय महत्त्वाची मूलभूत गरज बनली आहे. पण दुर्गम भाग असल्याने कोणतीही दूरसंचार कंपनी आपल्या भागाकडे लक्ष देण्यास तयार नाही. याबाबत संबंधित टेलीकम्युनिकेशन विभागाशी संपर्क साधून पारवाड आणि आजूबाजूच्या गावांना नेटवर्कची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पारवाड ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे.









