अभाविपची मागणी, आरपीडी कॉर्नर येथे आंदोलन
बेळगाव : राज्य सरकारकडून विद्यापीठांकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा परिणाम विद्यार्थी व शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. त्याचबरोबर विद्यापीठांना अनुदान दिले जात नसल्याने वाढीव बोजा विद्यार्थी व पालकांवर पडत आहे. या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेच्या बेळगाव शाखेतर्फे शुक्रवारी आरपीडी सर्कल येथे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारकडून केवळ गॅरंटी स्किमवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. इतर क्षेत्राकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नुकसान होत आहे. विशेषत: उच्च शैक्षणिक क्षेत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने दर्जा खालावत आहे. विद्यापीठांना वेळेवर अनुदान न देणे, वेळेत परीक्षेचा निकाल न लावणे, गुणपत्रिका व प्रमाणपत्र देताना तांत्रिक त्रूटी राहणे, विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची वानवा, तसेच वसतिगृहांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने समस्या वाढल्या आहेत. याचा परिणाम उच्च शिक्षणावर होत असून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. राज्य सरकारने या त्रुटी सुधारुन विद्यापीठांना अनुदान मंजूर करावे, अशी मागणी अभाविपतर्फे करण्यात आली. आरपीडी सर्कल येथे राज्य सरकार विरोधात घोषणा देत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उच्च शिक्षणाकडे लक्ष द्या, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अभाविपचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









