फळ-बागायत क्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱयांना प्रोत्साहन : संपर्काचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
फळ-पुष्प उत्पादकांना आर्थिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी नरेगा योजनेंतर्गत विविध जातीच्या रोप लागवडीला अनुदान दिले जाणार आहे. संबंधित शेतकऱयांनी बागायत खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हय़ात 2 लाखांहून अधिक बागायत शेतकरी आहेत. शिवाय अलीकडे बागायत शेतकऱयांची संख्या वाढली आहे. या शेतकऱयांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध फळ-पुष्प रोपांची लागवड करण्यासाठी अनुदान उपलब्ध होणार आहे. अनुसूचित जाती-जमाती, बीपीएल कार्डधारक, अल्पभूधारक शेतकरी आदी घटकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी शेतकऱयांना शेतीचा उतारा, आधारकार्ड, जॉबकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स आणि फोटो देणे आवश्यक आहे.
खात्यामार्फत स्थानिक वातावरणात येणारी रोपे दिली जाणार आहेत. त्यामध्ये आंबा, नारळ, डाळिंब, चिंच, लिंबू, पेरू, सीताफळ, फणस याबरोबर गुलाब, मोगरा, सूर्यफूल आदी पुष्प रोपांसाठी अनुदान उपलब्ध होणार आहे. दरवषी पावसाच्या तोंडावर हजारो झाडांची लागवड केली जाते. यंदा देखील विविध भागात वृक्षलागवडीला पसंती दिली जाणार आहे. त्याचबरोबर फळ बागायत क्षेत्र वाढविण्यासाठी अनुदान ही आधार ठरणार आहे. प्रति हेक्टरप्रमाणे फळबागायत शेतकऱयांना अनुदान उपलब्ध होणार आहे.
यंदा 2 हजार फुलझाडांची लागवड होणार
गतवषी 1200 पुष्प रोपांची लागवड झाली होती. यंदा त्यामध्ये वाढ झाली असून 2 हजार पुष्परोपांची लागवड होणार आहे. शासनाचा अनुदानाचा फायदा घेऊन शेतकऱयांनी बागायत क्षेत्र वाढवावे.
– प्रवीण महेंद्रकर (साहाय्यक निर्देशक बागायत खाते)









