वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
मार्सेल ग्रॅनोलर्स व होरासिओ झेबालोस यांनी येथे सुरू असलेल्या अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद मिळविताना अंतिम फेरीत नील स्कुपस्की व ज्यो सॅलिसबरी यांचा पराभव केला. या मोसमातील त्यांचे हे दुसरे ग्रँडस्लॅम अजिंक्यपद आहे.
ग्रॅनोलर्स-झेबालोस यांनी चुरशीच्या ठरलेल्या अंतिम लढतीत स्कुपस्की-सॅलिसबरी यांच्यावर 3-6, 7-6 (7-4), 7-5 अशी मात केली. या पाचव्या मानांकित जोडीने याआधी फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविले असून त्यावेळीही स्कुपस्की-सॅलिसबरी यांनाच त्यांनी हरविले होते. जेतेपदाचे त्यांना 10 लाख डॉलर्स बक्षीस मिळाले. याआधी ग्रॅनोलर्स-झेबालोस यांनी सुरुवातीला तीन वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते.
ग्रॅनोलर्स-झेबालोस ही जोडी पराभवाच्या उंबरठल्यावर होती. फक्त एक गुण गमविला असता ते पुन्हा एकदा उपविजेते ठरले असते. तिसऱ्या सेटमध्ये 5-4 वर असताना ब्रिटिश जोडीला तीन मॅचपॉईंट मिळाले होते. पण ग्रॅनोलर्स-झेबालोस यांनी पुढचे सलग आठ गुण मिळविल्यानंतर ग्रॅनोलर्सने परतीचा फटका मारून सामन्यातील एकमेव ब्रेकपॉईंट मिळविला आणि 6-5 अशी आघाडी घेतली. ग्रॅनोलर्सने हा गुण मिळविल्यानंतर वर्कआऊट रूममध्ये सामना पाहत असलेल्या त्याचा देशवासी अल्कारेझने उडी मारत आनंद साजरा केला. ग्रॅनोलर्सने नंतर आपल्या सर्व्हिसवर सामना संपवत जेतेपदही निश्चित केले.
सॅलिसबरी चौथ्यांदा यूएस ओपनचे जेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नात होता. यापूर्वी त्याने राजीव रामसमवेत 2021-23 असे सलग तीनवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. स्कुपस्कीसमवेत यावर्षी जोडी जमविल्यानंतर त्यांची ही एकूण पाचवी अंतिम लढत होती आणि पाचही स्पर्धांत त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले.









