वृत्तसंस्था / नवी दिल्ली
फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या दुसऱ्या डोले खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे अंजिंक्यपद भारतीय ग्रॅन्डमास्टर पी. इनियानने पटकाविले. ग्रॅन्डमास्टर इनियानने पोलंडचा ग्रॅन्डमास्टर जेन मॅलेकचा टायब्रेकरमध्ये पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली.
22 वर्षीय इनियान हा तामिळनाडूच्या इरोडेचा रहिवासी असून त्याने डोले स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत एकही पराभव पत्करला नाही. या स्पर्धेत त्याने उझबेकचा इंटरनॅशनल मास्टर मॅडेगस्केर तसेच तुर्की, फ्रान्स आणि पोलंडच्या खेळाडूंवर मात केली. त्याने या स्पर्धेत तीन डाव बरोबरीत राखले. 9 सामन्यांत त्याने 7.5 गुण मिळवित इंटरनॅशनल मास्टर पोलंडच्या मॅलेकशी बरोबरी साधली. मॅलेकनेही 7.5 गुण मिळविले होते. यानंतर उभय संघात झालेल्या टायब्रेकरमध्ये इनियानने मॅलेकचा पराभव केला. या स्पर्धेमध्ये 43 देशांचे 276 बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. टायब्रेकरमधील लढतीत उभय संघातील पहिला डाव बरोबरीत राहिला. त्यानंतर दुसऱ्या डावात काळ्या मोहरा घेवून खेळताना इनियानने मॅलेकचा 1.5-0.5 अशा गुणांनी पराभव करुन विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. या स्पर्धेत शेवटच्या डावापर्यंत आघाडीवर असलेला युक्रेनचा ग्रॅन्डमास्टर पॅव्हेल इलजेनोव्ह याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने 7 गुण नोंदविले.









