मध्यप्रदेशच्या देवसर मतदारसंघातील रंजक लढत
मध्यप्रदेशच्या सिंगरौली जिल्ह्यातील देवसर मतदारसंघात यावेळी रंजक लढत होणार आहे. येथे 80 वर्षीय ज्येष्ठ नेत्याच्या विरोधात 27 वर्षीय युवती उभी ठाकली आहे. काँग्रेसने येथे अधिक वयाचे उमेदवार वंशमणि प्रसाद वर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तर समाजवादी पक्षाने वंशमणि यांची नात डॉक्टर सुषमा प्रजापति यांना तिकीट दिले आहे.
डॉक्टर सुषमा या राज्यातील सर्वात कमी वयाच्या महिला उमेदवार आहेत. त्यांनी आमदार होण्याच्या इच्छेपोटी आता राजकारणात पाऊल ठेवले आहे. मागील अनेक वर्षांपासून माझे वडिल एच.एल. प्रजापति हे डॉक्टरी पेशासोबत राजकारणातही सक्रीय होते. माझे वडिल तालुका पंचायत समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. तसेच त्यांनी 2018 मधील विधानसभा निवडणूक लढविली होती असे सुषमा यांनी सांगितले आहे.
माझ्या वडिलांना काही लोकांमुळे राजकारणात फारसे यश मिळाले नाही. त्यांच्या विरोधात खटले दाखल करण्यात आले. यामुळे ते आता निवडणूक लढवू शकत नाहीत. याचमुळे वडिलांनी मला राजकारणात येण्यासाठी प्रेरित केले. मी पेशाने एक डॉक्टर असून आता राजकारणही करू इच्छिते. मतदारसंघातील ज्वलंत मुद्दे जनतेसमोर मांडून त्यांचा आशीर्वाद मागत असल्याचे सुषमा यांचे सांगणे आहे.
भाजप उमेदवारही मैदानात
देवसर मतदारसंघात माझे आजोबा वंशमणि वर्मा हे काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवत आहेत. तर मी समाजवादी पक्षाची उमेदवार असल्याचे तिने सांगितले आहे. सिंगरौली जिल्ह्dयातील देवसर मतदारसंघात भाजपने यावेळी विद्यमान आमदार सुभाष वर्मा यांच्याऐवजी राजेंद्र मेश्राम यांना उमेदवारी दिली आहे. वंशमणि वर्मा हे तीनवेळा आमदार राहिले आहेत. तसेच दिग्विजय सिंह यांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. मागील दोन निवडणुकांमध्ये त्यांना भाजप उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता. यावेळी या मतदारसंघात 12 उमेदवार उभे असल्याने विजयाचा मुकूट कोणाच्या शिरावर जाणार हे 3 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.









