दिव्या देशमुखने गुकेशला बरोबरीत रोखले, विदित गुजराथी पराभूत
वृत्तसंस्था/ समरकंद, उझबेकिस्तान
ग्रँडमास्टर निहाल सरिनने जर्मनीच्या मॅथियास ब्लूबॉमसोबत जलद आणि सहज बरोबरी साधली आणि फिडे ग्रँड स्विस स्पर्धेच्या आठव्या फेरीच्या अखेरीस जर्मन खेळाडूसोबत सहा गुणानिशी आघाडीवर राहण्यात यश मिळविलं. या दिवशी महिला विभागात कझाकस्तानच्या बिबिसारा असाउबायेव्हाकडून पराभूत झाल्याने आर वैशालीने तिची आघाडी गमवावी लागली. दुसरीकडे गतविजेता विदित गुजराथीलाही जर्मनीच्या विन्सेंट केमरसोबत झुंजताना अशाच निकालाला तोंड द्यावे लाले.
रशियाच्या कॅटेरिना लॅग्नोने पांढऱ्या सोंगाट्यांचा फायदा घेतला आणि ाgक्रेनच्या मारिया मुझीचूकला पराभूत केले. लॅग्नोने आठ गुणांपैकी 6.5 गुण मिळवले असून आता ती असाउबायेव्हा, वैशाली आणि चीनच्या युक्सिन साँगपेक्षा अर्ध्या गुणाने पुढे आहे. त्यांच्याकडे प्रत्येकी सहा गुण आहेत. निहालने काळ्या रंगाच्या सोंगाट्या घेऊन खेळताना क्वीन्स गॅम्बिटची निवड केली आणि ब्लूबॉमकडून त्याला कोणत्याही कठीण आव्हानाचा सामना करावा लागला नाही.
सदर जर्मन खेळाडूने या स्पर्धेत काही वेळा प्रभावी खेळ केलेला आहे. परंतु आठव्या फेरीत त्याने पुरेसे प्रयत्न केले नाहीत. दोन्ही खेळाडूंनी चालींची पुनरावृत्ती करून शेवटी खेळ फक्त 21 चालींमध्ये अनिर्णित राहिला. दुसरीकडे, असाउबायेव्हाने खेळाच्या शेवटच्या टप्प्यात वैशालीला मागे टाकले. कझाकस्तानच्या खेळाडूने जिंकणे आवश्यक असलेल्या सामन्यात प्रेरणादायी कामगिरी केली आणि वैशाली अडखळल्यानंतर असाउबायेव्हाचे तंत्र पूर्ण गुण मिळविण्याच्या दृष्टीने पुरेसे चांगले ठरले.
आता पुढच्या फेरीत वैशाली युक्सिन साँगशी लढेल. किताबाच्या शर्यतीत टिकून राहण्याच्या दृष्टीने ही लढत निर्णायक ठरू शकते. दरम्यान, सहा तास चाललेल्या आणि 100 हून अधिक चालींचा समावेश राहिलेल्या लढतीत महिला विश्वचषक विजेत्या दिव्या देशमुखने विश्वविजेत्या डी. गुकेशला बरोबरीत रोखले.









