कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या हत्येचा निषेध : पीडित कुटुंबाला न्याय देण्याची मागणी
प्रतिनिधी/ पणजी
कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा निषेध आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शनिवारी ‘आयएमए’च्या गोवा शाखेतर्फे पणजीत भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. ‘आयएमए’ने देशव्यापी संप पुकारला होता. त्याचाच एक भाग म्हणून गोव्यात डॉक्टरांनी येथील आझाद मैदान ते जुन्या गोमेकॉपर्यंत मूक मोर्चा काढला. या मोर्चात हजारो डॉक्टर व आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते. मूक मोर्चा दरम्यान राज्यातील महिला डॉक्टर, परिचारिकांना सुरक्षा देण्यासाठी गोवा वैद्यकीय कायद्यात दुऊस्ती करावी, जिल्हा कृती दलांची तत्काळ स्थापना करण्यासह इस्पितळांना सुरक्षित ठिकाणे म्हणून जाहीर करण्याची मागणी यावेळी डॉक्टरांकडून करण्यात आली. कोलकातातील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
कोलकाताच्या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारच्या देशव्यापी संपात सहभागी झालेल्या राज्यातील खासगी डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवून पणजीत मूक मोर्चा काढला. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, ‘आयएमए’च्या गोवा शाखेचे प्रमुख डॉ. संदेश चोडणकर, डॉ. शेखर साळकर, डॉ. रूफीन मोन्तेरो, सामाजिक कार्यकर्त्या सबिना मार्टीन्स यांच्यासह राज्यभरातील शेकडो डॉक्टर आणि परिचारिकांनी मोर्चाला हजेरी लावली होती. कोलकातातील महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या घटनेमुळे देशातील डॉक्टर सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने डॉक्टर, परिचारिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. कोलकाता प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे डॉ. चोडणकर म्हणाले.
वैद्यकीय कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे हेत नाही!
गोव्यात वैद्यकीय कायदा अस्तित्वात आहे. पण त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही. राज्य सरकारने या कायद्यात दुऊस्ती करण्यासह डॉक्टर, परिचारिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांच्या मागणीचे निवेदन आज सरकारला सादर करण्यात येणार असल्याचेही डे चोडणकर यांनी सांगितले.
सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची : डॉ. चंद्रकांत शेट्यो
डॉक्टर, परिचारिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे सरकारने डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य केल्या पाहिजे. त्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे आमदार डॉ. शेट्यो यांनी सांगितले. आमदार डॉ. चंद्रकात शेट्यो यांच्यासह डॉक्टरांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन सादर केले.
गोवा निवासी डॉक्टर संघटनेतर्फे निषेध!
गोवा निवासी डॉक्टर संघटनेनेही कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली तिच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा आणि संशयितांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी पाटो ते चर्च चौक पर्यंत मूकमोर्चा काढला. तसेच ‘आयएमए’ने पुकारलेल्या देशव्यापी संपात सहभाग दाखविला.