कसदार वाचन साहित्य देण्याची परंपरा कायमच : किरण ठाकुर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / बेळगाव
‘दै. तरुण भारत’च्या यंदाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन हिंडलगा येथील कार्यालयात सल्लागार संपादक आणि ‘लोकमान्य’ सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या हस्ते झाले. यावेळी संपादक जयवंत मंत्री, लोकमान्य सोसायटीचे सीएफओ वीरसिंग भोसले, व्यवस्थापक गिरीधर रवि शंकर, प्रॉडक्शन मॅनेजर धैर्यशील पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
दिवाळी अंकाचे संपादन प्रमुख बालमुकुंद पतकी यांनी उपस्थितांचे स्वागत करून दिवाळी अंकाबद्दल माहिती दिली. यंदा प्रस्थापितांबरोबरच नवोदित लेखक-कवींना संधी दिली असल्याचे ते म्हणाले. अंकात नामवंत आणि नवोदित अशा एकोणीस कथालेखकांना लिहिण्याची संधी मिळाली आहे. प्रा. वामन वाशीकर, प्रा. डॉ. चेतन कोटबागे, डॉ. सुहास नेने, शिबानी जोशी, गुरुनाथ तेंडुलकर, श्रीराम शिधये, डॉ. भाग्यश्री कुलकर्णी, सुचिता घोरपडे, गौरी भालचंद्र, उत्तरा जोशी, वृंदा कांबळी, शीतल कुलकर्णी, सुभाष सुंठणकर यांच्या कसदार कथा यंदा वाचायला मिळतील. मराठीतील आघाडीच्या कवी-कवयित्रींसह एकूण 47 कविता यात समविष्ट केल्या आहेत. कवयित्री संजीवनी बोकील, हर्षदा सुंठणकर, आसावरी काकडे, उत्तरा जोशी, डॉ. दिलीप कुलकर्णी, श्रीकांत नरुले, अनुराधा नेरूरकर, प्रतिभा सराफ, प्रसाद कुलकर्णी, अंजली मुतालिक वगैरेंच्या कवितांचा आस्वाद घेता येईल. ताज्या विषयांवरचे दोन परिसंवाद यात आहेत.
‘देवदास’ कादंबरीचा प्रवास विजय तरवडे यांनी करून दिला आहे. ‘ड्रग्जच्या विळख्यात फसलेला गोवा’ हा सागर जावडेकर यांचा लेख, संगीतोपचार हा डॉ. प्रतीक गायकवाड यांचा लेख आणि ‘नॉर्दर्न लाईट्सचा पाठलाग’ हे प्रवासवर्णन वाचण्यासारखे आहे. विवेक मेहेत्रे, विजय पराडकर, गुरु खिलारे, काशिनाथ जोशी, संजय मिस्त्री या आघाडीच्या व्यंगचित्रकारांची हास्यचित्रे दिवाळी अंकात पाहायला मिळतील. यंदा प्रशांत अर्जुनवाडकर यांचे वार्षिक राशीभविष्य आहे, अशीही माहिती संपादन प्रमुख बालमुकुंद पतकी यांनी दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी ‘तरुण भारत’च्या दिवाळी अंकांच्या प्रवासाचा आढावा घेतला. आर्थिक लाभाबरोबरच वाचकांची वाचनाची भूक भागविण्याचे काम तरुण भारतचा दिवाळी अंक करत असल्याचे ते म्हणाले. विविध वृत्तपत्रांचे दिवाळी अंक निघत असले तरी ‘तरुण भारत’ने आपली वेगळी परंपरा जपली असल्याचे ते म्हणाले. ‘तरुण भारत’चे ‘अन्यायाविरुद्ध झुंज’ हे ब्रिद आहे. त्यामुळे जनतेची विश्वासार्हता जपली असल्याचे सांगून त्यांनी तरुण भारतवर विश्वास दाखविलेल्या वाचकांचे आभार मानले. दिवाळी अंक तयार करताना सहकार्य केलेल्या सर्वांचेही आभार मानताना असाच लोभ ठेवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला ‘तरुण भारत’च्या विविध विभागांचे प्रमुख आणि परिवारातील सदस्य उपस्थित होते.









