हजारो भक्तांचा सहभाग, गावात चैतन्याचे वातावरण
उचगाव : बेकिनकेरे येथील लक्ष्मीदेवी मंदिराच्या वास्तुशांती, कळसारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाला उत्साहाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी लक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे गावात हजारो भाविकांच्या उपस्थितीत आगमन झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी लक्ष्मी मंदिर आवारात होमहवन, गृहप्रवेश, अभिषेक व धार्मिक विधी पार पडले. मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प पूर्ण झाल्याने ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झाला आहे. बुधवारी सकाळी जल्लोषात व वाजतगाजत मूर्तीच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. लक्ष्मी गल्ली, नागनाथ गल्ली, जोतिर्लिंग गल्ली, मारुती गल्ली, कृष्णानगर, गणपत गल्ली, रामनगर, ज्ञानेश्वरनगर मार्गे मार्गस्थ झाली. या मिरवणुकीत सुवासिनी डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. वारकरी मंडळी भजनात तल्लीन झाले होते. त्यामुळे गावात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यानिमित्त गाव रांगोळ्या, भगव्या पताक्या व विद्युत रोषणाई करून सजविण्यात आले आहे. पाच दिवशीय सोहळ्यात भजन, कीर्तन, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.









