30 हून अधिक ईव्ही कंपन्या सहभागी ः मारुतीची इलेक्ट्रिक कार प्रदर्शनात सादर
नवी दिल्ली
जानेवारी 11 पासून दिल्लीमध्ये ऑटो एक्सपो 2023 सुरू झाले आहे. ग्रेटर नोएडा येथील जेपी गोल्फ कोर्सजवळील इंडिया एक्स्पोमार्ट येथे भरले आहे. या प्रदर्शनामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला राहणार असल्याचा अंदाज अभ्यासकांचा आहे. यामध्ये 30 हून अधिक इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्या आणि स्टार्टअपचा समावेश राहणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान प्रदर्शनात मारुती सुझुकी व एमजी मोटर्स यांनी आपली नवी येणारी गाडी सादर केली आहे.
एमजी मोटर्सची हेक्टर ही नवी सुधारीत कार प्रदर्शनात सादर करण्यात आली. जिची किंमत 14 लाखापेक्षा अधिक असणार आहे.दुसरीकडे मारुती सुझुकीने आपली नवी इलेक्ट्रिक सुव्ह गटातील इव्हीएक्स ही कारदेखील प्रदर्शनात सादर केली आहे. 6 केडब्ल्यूएच बॅटरीसह येणारी ही गाडी 550 किमीचे अंतर कापेल असे सांगितले जात आहे. सदरची गाडी प्रत्यक्ष बाजारात 2025 पर्यंत आणली जाणार असल्याचे मारुती सुझुकीने म्हटले आहे. व्यावसायिक वाहन निर्माती कंपनी अशोक लेलँडनेही आपली 6 ऊर्जापर्यायी वाहने प्रदर्शनात सादर केली आहेत. हरित अशी इलेक्ट्रिक व हैड्रोजनवर आधारीत वाहने यात सादर करण्यात आली आहेत.
बेनेली, कीवे, टॉर्क मोटर्स, मॅटर एनर्जी, अल्ट्राव्हायलेट ऑटोमोटिव्ह, एलएमएल इमोशन, यामाहा आणि सुझुकी यांसारख्या अनेक लहान-मोठय़ा कंपन्यांनी आपली वाहने सादर केल्याचे कळते.
या कंपन्या नसतील
तथापि, होंडा, हिरो, बजाज आणि टीव्हीएससारख्या प्रमुख दुचाकी ब्रँड्सनी यावेळी प्रदर्शनापासून स्वतःला दूर ठेवले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी एलएमएल मोशन इलेक्ट्रिक बाईकसह अनेक भव्य दुचाकी दिसू शकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









