सर्वपक्षीय अतिक्रमण बचाव संघर्ष कृती समितीतीचा भव्य मोर्चा
शिरोळ/प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात पाच हजाराहून अधिक अतिक्रमणधारक असून त्या अतिक्रमणधारकांच्या घराच्या विटेलाही धक्का लावू देणार नाही अशी, ग्वाही आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil-Yadravkar) यांनी दिली.
उच्च न्यायालयाने (High Court) अतिक्रमण हटविण्याबाबत आदेश दिल्याने शिरोळ तालुक्यातील सुमारे २० गावातील २५ हजार कुटुंबाला अतिक्रमण हटवण्याची नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत, या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय शिरोळ तालुका अतिक्रमण बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर आज भव्य मोर्चा काढण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
शिरोळ तालुक्यातील अतिक्रमणधारक महिला-पुरुष मोठ्या संख्येने शिवाजी चौकात जमले होते. दुपारी बारा वाजता शिवाजी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. अतिक्रमण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत तहसीलदार कार्यालय आवारात मोर्चा आला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना भाजपाचे नेते अनिल राव यादव म्हणाले की, उच्च न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र शासनाने कायद्यात बदल करावा, अथवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी. कोणत्याही अतिक्रमणधारक नागरिकांच्या घराला धक्का लागू देणार नाही. शिरोळ तालुक्यातील जी आंदोलनाची ठिणगी पडते ते संपूर्ण राज्यात पसरते. हा आजपर्यंतचा इतिहास असून शासनाने वेळीच लक्ष घालून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी केली.
यावेळी खासदार धैर्यशील माने, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकार मादनाईक पांडुरंग गायकवाड सुरेश सासने यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळी विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.