अभिनेते नाना पाटेकर यांची उपस्थिती : उद्घाटनपर सोहळा शगून गार्डन येथे उत्साहात : टिळकवाडी रानडे रोडवर हॉस्पिटल कार्यरत
बेळगाव : गरजा सीमित ठेवल्या की आयुष्य सोपे होऊन जाते. समाजाशिवाय आपण जगू शकत नाही आणि या समाजात व्याधीशिवायही माणसे आजारी आहेत. त्यांचे दु:ख जाणून घेऊन त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. डॉ. नीता देशपांडे संचालित ‘सेंट्राकेअर हॉस्पिटल’ने त्या अनुषंगाने काम करावे, अशी अपेक्षा नामवंत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. टिळकवाडी रानडे रोडवरील ‘सेंट्राकेअर हॉस्पिटल’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटनपर सोहळा शगून गार्डन येथे झाला. व्यासपीठावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी, केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ व सेवा सदनच्या डॉ. अमृता दाते आणि नीता देशपांडे उपस्थित होत्या.
नाना पाटेकर म्हणाले, कोणत्याही हॉस्पिटलचा फायदा गरीब आणि पददलितांना झाला पाहिजे. आपण नि:स्पृहपणे काम केले तर यश नक्कीच मिळणार आहे. आज माणसे आत्मकेंद्रित झाली आहेत. वातावरण बदलत चालले आहे. आपलेच दु:ख मोठे वाटते, अशा वेळी आभाळाएवढे दु:ख सोसणाऱ्या शेतकऱ्यांकडे आपण पाहायला हवे. त्याचे ऐश्वर्य म्हणजे त्याची जमीन आभाळाखाली आहे आणि सतत पाऊस, टोळधाड, पूर यामुळे शेतकरी संकटात येत आहे, पण तो जगतो. त्याच्याकडे आपण पाहून त्याच्यासह सर्व वंचितांसाठी काम करायला हवे. आज समाजात व्याधी नसली तरी माणसे आजारी आहेत. हे आजारपण डॉक्टरांनी समजून घ्यावे. मानसिक सुदृढता या समाजात सर्वांना परस्परांची गरज आहे. आयुष्याच्या शेवटी आपल्याबद्दलच आदर वाटला पाहिजे, असे कार्य करण्याची गरज असून कमीत कमी फायदा ठेऊन रुग्णांप्रति आपुलकी आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
प्रारंभी तन्वी इनामदार हिने प्रार्थना सादर केली. हॉस्पिटलचे संचालक दीपक करंजीकर यांनी नाना पाटेकर व भिडे गुरुजी यांचा परिचय करून दिला. नीता देशपांडे व रोहित देशपांडे, तसेच डॉ. आनंद सनेकल, डॉ. नरेंद्र पाटील यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. दीपप्रज्वलनानंतर प्रास्ताविक करताना डॉ. नीता देशपांडे म्हणाल्या, हॉस्पिटल सुरू झाले आहे. परंतु योग्य व्यक्ती उद्घाटनासाठी येण्याची प्रतीक्षा होती. आजचे दोन्ही पाहुणे अतिशय कार्यक्षम आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुकूलतेनुसार उद्घाटन सोहळा ठरविला. त्यांनीच डॉ. प्रभाकर कोरे यांचा परिचय करून दिला.
यावेळी संभाजी भिडे म्हणाले, आपल्या देहाचे दारिद्र्या म्हणजे रोग होय. हे रोग दूर करण्यासाठी आपल्या संस्कृतीने सूर्योपासना सांगितली आहे. सूर्यनमस्कार करा, कोणतीही व्याधी तुम्हाला होणार नाही. आपल्या गंगेचे पाणी अतिशय शुद्ध आहे. गंगेचा प्रवाह हिमालयातून येतो तेव्हा त्यात युरेनियम, थोरेनियम असे धातू घेऊनच तो पुढे येतो. त्यामुळे गंगेचे पाणी नेहमी शुद्ध असते. या आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून सूर्योपासना करण्याचे आवाहन त्यांनी केले. आमदार राजू सेठ यांनी, आज बेळगावला उत्तम हॉस्पिटल आणि डॉक्टरांची गरज आहे. त्यामध्ये आज ‘सेंट्राकेअर’ची भर पडली आहे, असे सांगितले. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रुग्ण डॉक्टरांना देवस्वरुपात पाहतात, हे लक्षात घेऊन त्यांनी उपचार करावेत, असे सांगून शुभेच्छा दिल्या.
डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, बेळगाव आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य केंद्र म्हणून नावारुपाला येत आहे. आज वेगवेगळे रोग वाढत आहेत. त्यामुळे डॉक्टरांची संख्याही वाढत आहे. परंतु समाजातील रुग्णांची संख्या कमी होणे आवश्यक आहे. उत्तम हॉस्पिटल्समुळे रुग्णांना उत्तम सेवा मिळणार असून डॉ. नीता यांचे वैद्यकीय शिक्षण जेएनएमसीमध्ये झाले आणि त्या प्राध्यापक म्हणूनही काम करत होत्या, याचा आपणाला अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन अक्षय टाकळकर यांनी केले. रोहित देशपांडे यांनी आभार मानले.









