नियोजनाबाबत धारकऱ्यांना केले मार्गदर्शन
बेळगाव : दुर्गामाता दौडचे बेळगावमध्ये यावर्षी 25 वे वर्ष असणार आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त बेळगाव शहर तसेच ग्रामीण भागात भव्यदिव्य दुर्गामाता दौड काढली जाणार आहे. देव, देश आणि धर्म याची माहिती प्रत्येक तरुणाला व्हावी या उद्देशाने दौडमध्ये उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी सोमवारी आयोजित बैठकीत दिली.
शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान बेळगाव विभागाची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी अनसुरकर गल्ली येथील छत्रेवाडा येथे पार पडली. या बैठकीमध्ये आगामी होणाऱ्या दुर्गामाता दौडविषयी धारकऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. नवरात्रीच्या काळात शहराच्या विविध भागांमध्ये दुर्गामाता दौड काढून देशाभिमानाचा जागर केला जातो. सळसळत्या रक्ताच्या तरुणाईला आपली संस्कृती, धर्म या विषयी माहिती करून दिली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य दौड काढण्याबाबत चर्चा करण्यात आली.
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दौडमध्ये स्वराज्यातील मावळ्यांचे वारसदार बोलविण्यात येणार आहेत. याबरोबरच दसऱ्या दिवशी होणाऱ्या सभेवेळी शिवचरित्राविषयीचे अभ्यासक बोलविण्याबाबत कार्यकर्त्यांशी विचारविनीमय करण्यात आला. दुर्गामाता दौड ही केवळ नवीन कपडे परिधान करून मिरविण्यासाठी नसून हिंदू संस्कृती नसानसात भिनविण्याचा हा सण असल्याने प्रत्येकाने धार्मिक भावनेने या दौडमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.









