पुणे / प्रतिनिधी :
जाईन गं माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा । आपुलिया ।। विठुयारायाची भेटी आस…टाळ-मृदंगाचा अखंड गजर…त्या तालावर डौलणारे वारकरी…अन् सर्वत्र भरून राहिलेला भक्तीचा दरवळ…अशा अत्यंत प्रसन्न वातावरणात व पवित्र इंद्रायणीच्या साक्षीने अलंकापुरीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने रविवारी सायंकाळी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. वैष्णवांची मांदियाळी व विठुनामाच्या गजराने अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो वारकरी इंद्रायणी काठी एकवटलेल्या इंद्रायणीला जणू महापूरच आला होता. विठ्ठलभक्तीच्या या शीतल वर्षावात आळंदी आज अक्षरशः चिंब-चिंब झाली. पहाटे चार वाजता मुख्य मंदिरात घंटानाद घणघणला आणि सोहळयाला सुरुवात झाली. काकड आरती, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती हे धार्मिक विधी पार पडले. पहाटे पाच ते सकाळी नऊ यादरम्यान भाविकांच्या महापूजा आणि श्रींचे समाधी दर्शन सुरू करण्यात आले. दुपारी बारापर्यंत श्रींच्या समाधी दर्शनास गाभारा भाविकांसाठी खुला राहिला. दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत श्रींचा गाभारा स्वच्छ करून समाधीस जलाभिषेक, महानैवेध्य दाखविण्यात आला. त्यानंतर दुपारी दोनपर्यंत श्रींच्या दर्शनासाठी गाभारा खुला राहिला.
श्रींच्या वैभवी प्रस्थान सोहळ्यासाठी 47 दिंडय़ांना मंदिरात प्रवेश देण्यासाठी दुपारी पावणे तीनला प्रारंभ झाला. त्यानंतर ‘श्री’ंना आभूषित करण्यात आले. पालखी सोहळयासाठी माऊलींना भरजरी वस्त्र, मेखला चढविल्यानंतर चांदीचा मुकुट, सर्व दागदागिने आणि फुलांनी सजविण्यात आले. सायंकाळी पालखी प्रस्थान सोहळयाची लगबग सुरु झाली. टाळ-मृदंग आणि ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात दिंडयांनी महाद्वारातून मंदिरात प्रवेश केला. अंकली (बेळगाव) येथील मानाचे अश्व महाद्वारातून मंदिरात आल्यानंतर टाळ-मृदंगाचा स्वर टीपेला पोहोचला. अशा भारलेल्या वातावरणातच माउलींचा जयघोष करत आळंदीकरांनी पालखी खांदयावर घेत नाचविली आणि वीणामंडपातून उचलून बाहेर आणली. पालखीने सायंकाळी पंढरीकडे प्रस्थान ठेवले अन् वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.








