बेळगाव : नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून भारत यात्रा काढली जात आहे. बुधवार दि. 20 रोजी ही यात्रा बेळगावमध्ये येणार असून बेळगावमध्ये भव्य बाईक रॅली काढली जाणार आहे. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेब्बळ्ळी यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
केंद्र सरकारने जुनी पेन्शन योजना रद्द करून नवीन पेन्शन योजना लागू केली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याबद्दल दिल्ली येथून भव्य भारत यात्रा काढली जात आहे. मंगळवार दि. 19 रोजी रात्री ही यात्रा बेळगावमध्ये दाखल होईल. बुधवार दि. 20 रोजी सकाळी 10.30 वा. चन्नम्मा सर्कल येथून बाईक रॅलीला सुरुवात होईल. यामध्ये 5 हजारहून अधिक सरकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत.
बाईक रॅलीनंतर केपीटीसीएल सभागृहात बैठक होणार आहे. या बैठकीनंतर रॅली धारवाडच्या दिशेने रवाना होईल. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सरकारी कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.









