बेळगाव उत्तरमध्ये म. ए. समितीचा भगवा फडकविण्याचा निर्धार : रॅलीत असंख्य कार्यकर्त्यांचा सहभाग
बेळगाव : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बेळगाव उत्तर मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे भव्य बाईक रॅली काढण्यात आली. अॅड. अमर येळ्ळूरकर यांच्या प्रचारार्थ शहराच्या मध्यवर्ती भागातून काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये शेकडोंच्या संख्येने तरुणाई सहभागी झाली होती. बेळगाव उत्तरमध्ये यावेळी म. ए. समितीचा भगवा ध्वज फडकविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. कपिलेश्वराचे दर्शन घेऊन सोमवारी सकाळी बाईक रॅलीला प्रारंभ झाला. भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली, पाटील गल्ली, तानाजी गल्ली, शिवाजी रोड, रामलिंगखिंड गल्ली, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, काकतीवेस, कंग्राळ गल्ली, गोंधळी गल्ली, कॉलेज रोड, खडक गल्ली, भडकल गल्ली, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली येथून चन्नम्मा चौक येथे गणेश मंदिरात बाईक रॅलीची सांगता झाली. बाईक रॅलीमध्ये माजी महापौर सरिता पाटील, उपमहापौर रेणू किल्लेकर, माया कडोलकर, वैशाली हुलजी, विद्यमान नगरसेवक शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे, शुभम शेळके, पियुष हावळ, सुनील बाळेकुंद्री, महादेव चौगुले यांच्यासह शेकडोंच्या संख्येने युवा कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या होत्या. म. ए. समितीला मतदान करून मराठी स्वाभिमान दाखविण्याचे आवाहन या बाईक रॅलीतून करण्यात आले.
कणबर्गी येथे समितीचा झंझावात
रविवारी सायंकाळी कणबर्गी गावामध्ये अॅड. अमर येळ्ळूरकर यांनी झंझावाती प्रचार केला. बेळगाव शहराप्रमाणेच कणबर्गीमध्येही येळ्ळूरकरांचे जोरदार स्वागत करण्यात आले. कणबर्गीमध्ये मराठी भाषिकांची संख्या मोठी असल्यामुळे येथूनही म. ए. समितीला चांगले मतदान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. अॅड. अमर येळ्ळूरकर म्हणाले, मराठी भाषिकांनी विश्वासाने उमेदवारी दिली असून निवडून येऊन हा विश्वास सार्थकी लावू. तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावू, असे त्यांनी सांगितले.









