बेळगाव : जगाला समानतेचा दिव्य संदेश देणाऱ्या जगद्ज्योती बसव़ेश्वर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी गोवावेस येथील बसव़ेश्वर सर्कलपासून बाईक रॅली काढण्यात आली. कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी, नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू स्वामीजींच्या सानिध्यात ही रॅली काढण्यात आली. खासदार जगदीश शेट्टर, केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष व अखिल भारत वीरशैव लिंगायत महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ आदींच्या हस्ते बसवेश्वरांच्या पुतळ्याचे पूजन करून षट्स्थल ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महात्मा बसवेश्वरांचा जयजयकार करण्यात आला.
महासभेच्या जिल्हाध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद, जागतिक महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी, लिंगायत संघटनेचे इरण्णा देयन्नावर, राष्ट्रीय बसव दलाचे अशोक भेंडीगेरी, चंद्रशेखर बेंबळगी, शंकर गुडस, अॅड. एम. बी. जिरली, आदींसह अनेक जण यावेळी उपस्थित होते. अखिल भारत वीरशैव लिंगायत महासभा, जागतिक लिंगायत महासभा, लिंगायत संघटना, राष्ट्रीय बसव दल, लिंगायत महिला समाज, लिंगायत सेवा समिती, बसव कायकजीवी संघ, बसवेश्वर युवक संघ, महांतेशनगर येथील लिंगायत धर्म महासभा, सह्याद्रीनगर येथील क्षेमाभिवृद्धी संघ, लिंगायत बिझनेस फोरम, दानम्मादेवी मंदिर व बसवेश्वर कल्याण मंटप आदी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. डॉ. प्रभाकर कोरे यांनी बाईक रॅलीला चालना दिली. शहरातील प्रमुख मार्गांवरून जाऊन रामतीर्थनगर येथे बाईक रॅलीची सांगता झाली.
विश्वगुरु जगद्ज्योती बसवेश्वर रेल्वे उड्डाणपूल
गोगटे सर्कलजवळील रेल्वे उड्डाणपुलाचे विश्वगुरु जगद्ज्योती बसवेश्वर रेल्वे उड्डाणपूल असे नामकरण करण्यात आले. बसवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते, मठाधिशांच्या उपस्थितीत नामकरण करण्यात आले.









