आळते वार्ताहर
आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत माझी माती, माझा देश अभियान राबवणे. सन 2023-24 चे 15 वित्त आयोगाचा आराखडा वाचन करणे. यासह विविध विषयांना अनुसरून आळते ग्रामपंचायतीची ग्रामसभा वादळी ठरली. सरपंच अजिंक्य इंगवले यांनी सभेचे ठिकाण बदलून पार कट्यावरती सभा घेण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी सभेसाठी प्रचंड गर्दी केली होती. प्रभारी ग्रामविकास अधिकारी आयेशा कवठेकर यांनी सभेपुढील विषय वाचनाला सुरुवात केली. मागील गावसभेचे प्रोसिडींग वाचून कायम करण्याचा मुद्दा वादाचा ठरला.
ग्रामपंचायतीने मागील दोन गावसभा न घेताच खोटे प्रोसिडींग लिहिल्याचा आरोप विरोधी गटनेते जावेद मुजावर यांनी केला. अलका कांबळे यांनी एकाही सदस्याला नोटीस न देता 19 मे ला सभा घेतलीच कशी, असा प्रश्न विचारला. सरपंच अजिंक्य इंगवले यांनी हा आरोप खोडून काढत रितसर सभा घेतल्याचे सांगितले. यातून वादाला तोंड फुटले. प्रकरण हमरीतुमरीवर गेले. यामुळे सभेमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. अजेंड्यावर असलेल्या विषयांचे वाचन करून सभा संपल्याचे सरपंच इंगवले यांनी सांगितले.
यावेळी काही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, शिवीगाळ करणे असे प्रकार घडले. सभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांचे समर्थक एकमेकांना भिडल्याने पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. सर्वांना विलास कांबळे, संजय कांबळे यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला.
सभेमध्ये सरपंचांनी लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणे अपेक्षित असताना त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे महत्वाच्या विषयावर चर्चा झाली नाही. तरीही सरपंच अजिंक्य इंगवले यांनी सभा संपल्याचे जाहीर केल्याचा आरोप विरोधी गटाने केला.
विरोधी महापरिवर्तन आघाडीचे प्रमुख प्रवीण जनगोंडा यांनी सत्ताधारी गट दडपशाहीचे राजकारण करून जनतेच्या भावना दडपण्याचा प्रयत्न करत असून याचा जाब रस्त्यावर उतरून विचारू, असे सांगितले. तर विरोधी गट नेते जावेद मुजावर यांनी मे महिन्यातील गाव सभा न घेताच खोटी कागदपत्रे तयार करून गावसभा घेतल्याचे दाखवल्याने न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.









