महात्मा गांधी -लालबहाद्दूर शास्त्री जयंती निमित्त विविध कार्यक्रम-स्वच्छता मोहीम : परिसर स्वच्छतेसाठी अनेक गावांतून कार्यकर्त्यांचा पुढाकार
कंग्राळी खुर्द गावात स्वच्छ भारत मोहिमेला प्रारंभ
कंग्राळी खुर्द गावामध्ये रविवारी ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छ भारत आंदोलन व गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्यावतीने पार पडला. भारत सरकारने सुरू केलेल्या ग्रामस्वच्छता आंदोलन कार्यक्रमानिमित्त गावामध्ये ठिकठिकाणी ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन स्वच्छतेमुळे होणारे फायदे, रोगराई कशी लांब राहते, निरोगी आरोग्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर कशा पद्धतीने स्वच्छ ठेवावा, घरातील केरकचरा रस्त्यावर न टाकता कचरागाडीत टाकावा, असे आवाहन करत घरापासूनच स्वच्छता मोहिमला सुरुवात केली. यावेळी ग्राम पंचायत कार्यालयासमोरील व छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचा परिसर स्वच्छ करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून वयाची शंभरी गाठलेल्या गावातील ज्येष्ठ महिला यशोदा कल्लाप्पा पाटील व सुनिता बाळेकुंद्री यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रा. पं. सदस्य, सदस्या, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका, ग्रा. पं. कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धामणे येथे ग्रामपंचायततर्फे
धामणे येथे ग्रा. पं. च्यावतीने रविवार दि. 1 रोजी ग्रा. पं. आवारात स्वच्छता अभियानचा शपथबद्ध कार्यक्रम पार पडला. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त धामणे ग्रा. पं. च्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प करण्यात आला. सुरुवातीला ग्रा. पं. अध्यक्ष पंडित पाटील, उपाध्यक्ष अशोक पाटील, पीडीओ उषा एस. व धामणे विभाग आरोग्य अधिकारी डॉ. शोभा कुळ्ळीकुटी यांनी उपस्थित गावकऱ्यांना कचराकुंडीतच कचरा टाकतो आणि गाव स्वच्छ राखण्यासाठी आम्ही गावकरी मदत करतो, अशी शपथ देण्यात आली. त्यानंतर उपस्थितांतर्फे झाडू मारून अभियानाला सुरुवात झाली. याप्रसंगी गावातील महिला व नागरिक, अंगणवाडी शिक्षिका, आशा कर्मचारी आणि ग्रा. पं. कर्मचारी उपस्थित होते.
संतिबस्तवाड येथे एक तारीख एक तास स्वच्छता मोहीम
संतिबस्तवाड गावात रविवारी एक तारीख एक तास स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ग्राम पंचायततर्फे आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत विश्वेश्वरय्या तांत्रिक युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटीचे कुलपती प्राध्यापक विद्याशंकर यांच्या हस्ते कचरा उचलण्यासह एक तारीख एक तास कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. गाव तालुका स्वच्छ करण्यासाठी सर्वांनी हातभार लावणे गरजेचे आह। असे विद्याशंकर यांनी सांगितले.कार्यक्रमात ग्रा.पं. अध्यक्षा लक्ष्मी पी. चन्नीकुप्पी, पी. व्ही. कडकडकाई, हरीषा बेंडीगेरी, विमला पुजेरी, पीडीओ मालपुरी जि. जिद्दीमनी, ग्रा. पं. सदस्य व विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित होत्या. ग्राम पंचायतसमोर, मराठी प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
उचगावमध्ये ग्राम स्वच्छता अभियान
2 ऑक्टोबर गांधी जयंती व लालबहादूर शास्त्राr जयंतीनिमित्त उचगाव ग्रा. पं.तर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी छ.शिवाजी महाराज चौकापासून ते गांधी चौकापर्यंत स्वच्छता करण्यात आली. तसेच ग्रा. पं. समोरील सर्व कचरा काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रत्येक गल्लीतील कचरा काढून स्वच्छ करण्यात आले. यावेळी गेले दोन दिवस ग्राम पंचायत सदस्यांनी स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. शक्य होईल तेवढा कचरा काढून स्वच्छता करण्यात येत आहे. या स्वच्छता अभियानामध्ये ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, सदस्य एल. डी. चौगुले, यादो कांबळे, बंटी पावशे, जावेद जमादार, ग्रा. पं. सदस्य व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता.









