सांगली :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाननिमित्त बुधवारी जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत प्रशासन सक्षमीकरणावर भर देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिली. हे अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या काळात होणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर गौरवण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे, ग्रामपंचायतमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामस्थांना सुलभसेवा देणे, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय आदी क्षेत्रात ग्रामपंचायतीचा सहभाग वाढवणे या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येत आहे.
नरवाडे म्हणाले, या अभियानात प्रत्येक ग्रामपंचायतची वेबसाईट तयार करण्यात येणार आहे. यावर ग्रामस्थांना त्यांची तक्रार किंवा काही सूचना असतील तर ते देऊ शकतील. तसेच देश-विदेशात कुठूनही त्यांना ग्रामपंचायतीचे दाखले, सेवा घेता येणार आहे.
ग्रामसभेत या अभियानासाठी ग्रामस्तरीय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच विषयवार लहान गट स्थापन केले जाणार आहेत. ग्रामपंचायत स्वतःचे उत्पन्नाचे स्त्रोत तयार व्हावे जेणेकरून ग्रामपंचायत स्वावलंबी होतील यासाठी अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. प्रत्येकाने एक झाड लावून जगवणे पाण्याचा ताळेबंद तयार करणे, निमियामुक्त गाव असे उपक्रम राबवले जाणार आहेत. लोकसहभागातून, श्रमदानातून कामे केली जाणार आहेत.
- नऊ हजार दिव्यांगांना ओळखपत्र देणार
जिल्ह्यात अद्यापही ९ हजार दिव्यांगाकडे केंद्र शासनाचे ओळखपत्र (युडीआयडी) नसल्याची माहिती पुढे आली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये दिव्यांग सक्षमीकरणातून या लाभार्थीना ओळखपत्र देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
- कनिष्ठ अभियंत्याची आत्महत्या दुर्देवी
जत तालुक्यातील कनिष्ठ अभियंत्याने केलेली आत्महत्या दुर्दैवी आहे. कामाचा तणाव होता की कुणाचा दबाव होता, याबाबत माहिती घेतली जात आहे. यापुढे असे काही घडू नये, याची काळजी घेऊ असे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सांगितले.








