गल्लीतील मुलांच्या जीवितास धोका, विहिरीवर त्वरित झाकण बसवण्याची नागरिकांची मागणी
वार्ताहर/किणये
एकेकाळी संपूर्ण राकसकोप गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर सध्या पाणी असूनही ओसाड पडली आहे. या विहिरीकडे ग्रामपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. विहिरीवर झाकण नसल्यामुळे ती धोकादायक बनली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. सुमारे 100 वर्षांपूर्वी या विहिरीची खोदाई करण्यात आली. अवघ्या तीस फुटावरच या विहिरीत पाणी आहे. या विहिरीचे पाणी पाईपलाईनद्वारे संपूर्ण गावाला पुरवण्यात येत होते. विहिरीचे पाणी पाईपलाईनद्वारे गावातील टाकीमध्ये सोडून नळाच्या माध्यमातून संपूर्ण गावाला पुरविण्यात येत आहे.
गावासाठी पाणी : जमेची बाजू
चव्हाट गल्लीच्या मध्यभागी असलेल्या या विहिरीचे पावसाळ्यात अवघ्या दोन फुटावर पाणी असते. उन्हाळ्यात 10-15 फुटावर पाणी मिळते. गावातील नळाला पाणी येत असल्यामुळे सध्या या विहिरीकडे व या विहिरीच्या पाण्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे. मात्र ही विहीर गल्लीमध्ये आहे. या विहिरीला योग्य प्रमाणात कठडा नाही तसेच विहिरीवर झाकण बसवलेले नाही. पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिकांची व विहिरीची खोदाई करण्यात येते. पाणी न लागलेल्या कूपनलिका व विहिरी तशा पडून असतात. या कूपनलिका व विहिरीमध्ये पडून अनेक बालकांचा बळी गेलेला आहे. कूपनलिकेची खोदाई केल्यानंतर त्यावर झाकण बसविणे हे कूपनलिका मालकाचे कर्तव्य आहे.
दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
गल्लीमध्ये पूर्वीपासूनची विहीर आहे. विहिरीत सध्याही पाणी आहे. मात्र याचे पाणी आता कोणी वापरत नाहीत. पण या विहिरीला बाजूने कठडा नाही. तसेच विहिरीवर संरक्षक झाकण बसवण्यात आले नाही. गल्लीमध्ये लहान मुले या ठिकाणी खेळत असतात. विहिरीवर झाकण बसविण्याची मागणी अनेकवेळा केली. तरीही याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. तरी मोठा अनर्थ घडण्यापूर्वीच ग्रा.पं.ने पाहणी करून झाकण बसवावे.
– दिलीप पाटील










