वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द गावामध्ये शासकीय निधीतून जवळजवळ 45 लाख रुपये खर्च करून सुसज्ज असे ग्रंथालय बांधले असून ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी याचा पुरेपूर वापर करून गावातून अनेक प्रशासकीय अधिकारी घडावेत व गावचे नाव उज्ज्वल करावे, असे विचार महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. कंग्राळी खुर्द येथे सोमवारी शासकीय निधीतून बांधलेल्या नूतन ग्राम पंचायत कार्यालय व ग्रंथालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ग्रंथालयात इंटरनेट, स्पर्धा-परीक्षा, मार्गदर्शन पुस्तके, कथा, कादंबऱ्या व अन्य पुस्तके आहेत.
त्याचा वापर करून शैक्षणिक जीवनात यशस्वी व्हा, असे आवाहन केले. ग्राम पंचायतीच्या नव्या इमारतीत सर्व प्रकारची कागदपत्रे, जन्म-मृत्यू दाखले उतारे, शासकीय योजना व इतर माहिती उपलब्ध राहणार आहेत, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करण्यात आले. खासदार जगदीश शेट्टर, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, काडा अध्यक्ष युवराज कदम, ग्राम पंचायत अध्यक्षा दोडव्वा माळगी, उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटीलसह अन्य सदस्य व मान्यवरांनी फित कापून नूतन ग्रंथालय, ग्रा. पं. कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पीडीओ गोपाळ नाईक यांनी स्वागत केले. रमेश कांबळे यांनी प्रास्ताविकामधून नूतन ग्रा. पं. कार्यालय बांधकामाचा आढावा घेतला. त्यानंतर सर्व सदस्यांच्या हस्ते आमदार राजू सेठ, पोलीस निरीक्षक उस्मान औरी यांना शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विविध मंडळे, संघटना, महिला मंडळे व स्त्राr संघांनी मंत्री हेब्बाळकर यांचा सत्कार केला. यावेळी काडा अध्यक्ष युवराज कदम, माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील,सदस्य प्रशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना या दोन्ही इमारती होण्यासाठी लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रयत्न मोलाचे असल्याचे सांगितले.
गावात सव्वादोन कोटी रुपये विकास अनुदान दिले असून शेतकऱ्यांच्यावतीने लक्ष्मी तलावावरील कट्टा व कालवा, म. फुले मंडळच्यावतीने कार्यालयासमोरील टीसीची जागा बदल, गावातील श्री लक्ष्मी व श्री मारुती मंदिर जीर्णोद्धारासाठी निधी देणे, या संदर्भात निवेदने दिली. निवेदनाचा स्वीकार करून सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन मंत्री हेब्बाळकर यांनी दिले. यावेळी सर्व ग्रा. पं. सदस्य, महिला मंडळे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक टी. डी. पाटील यांनी केले. ग्राम पंचायत सदस्य कल्लाप्पा सनदी यांनी आभार मानले.









