Gram Panchayat Election 2022 : Story By Krishnat Chougule kolhapur
जिह्यातील 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान होत आहे. त्यासाठी 28 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल.ही निवडणूक पक्षीय पातळी बरोबरच गावातील गटातटांमध्ये होत असल्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. गावची सत्ता पुन्हा आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी मंडळी केलेल्या विकासकामांचे मार्केटिंग करत आहेत. तर विरोधी आघाड्यांकडून सत्ताधाऱ्यांच्या वर्मावर बोट ठेवून आपल्याच आघाडीला मतदान केल्यानंतर गावचा विकास कसा होईल ? हे पटवून दिले जात आहे. तर काही गावांत गतपंचवार्षिक निवडणुकीतील राजकीय समिकरणामध्ये बदल झाला असून नवीन मोट बांधली जात आहे. त्यामुळे गावच्या सत्तेसाठी काय पण ! असेच चित्र जिह्यातील ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीतून स्पष्ट होत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सध्या इच्छूक उमेदवारांकडून वैयक्तीक भेटीगाठीवर अधिक भर दिला जात आहे.यापूर्वी गावामध्ये दोन किंवा तीन राजकीय गट असायचे. पण सध्या सोईस्कर अशा स्थानिक आघाड्या तयार झाल्या आहेत. त्यामुळे लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये परस्पर विरोधात असणाऱ्या गावपुढाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गळ्यात गळे घातल्याचे चित्र आहे.
अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा- World Heritage Week : जागतिक वारसा जपणारे कोल्हापूर वस्तुसंग्रहालय
धनशक्ती विरूद्ध जनशक्ती
शासनाकडून 15 व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना दिला जातो. हा निधी सरपंचाच्या सहीने खर्च होतो. या निधीसह ग्रामपंचायतीमधील इतर महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार सरपंचला बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे हे पद मिळवण्यासाठी आता साम, दाम, दंड ही राजकीय निती वापरली जात आहे. काही गावांत अनेक वर्षे सत्ता उपभोगूनही तीच मंडळी पुन्हा सरपंच पदाच्या रिंगणात आहेत. त्यामुळे गटाच्या नावाखाली स्वार्थ साधणाऱ्या मंडळीविरोधात बंड होण्याची शक्यता असून ‘धनशक्ती विरूद्ध जनशक्ती’ अशा लढती होण्याची शक्यता आहे. यामध्ये ग्रामस्थांकडून तरुण, होतकरू आणि गावाच्या विकासकामांना योगदान देणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
तात्पुरत्या प्रलोभनाला बळी पडण्याऐवजी शाश्वत विकास गरजेचा
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये धनदांडग्या गटनेत्यांकडून मतदारराजाला अनेक तात्पुरती प्रलोभने दाखवली जाणार आहेत. ‘आपण म्हणेल त्याच्याकडे गावची सत्ता’ अशा पद्धतीने वाटचाल सुरु असून त्यांच्याकडून अयोग्य उमेदवारांना पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी तात्पुरत्या प्रलोभनाला बळी पडण्याऐवजी गावच्या शाश्वत विकासासाठी पारदर्शी उमेदवारांना निवडून देण्याची गरज आहे.
अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा- शिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्ह व लेटरहेडचा गैरवापर
घराणेशाही मोडीत काढण्याची जनतेला संधी
थेट जनतेतून सरपंच पदाची निवड होणार असल्यामुळे ही निवडणूक लढविण्यासाठी तरूणाई इच्छूक आहे. त्यामुळे घराणेशाही मोडीत निघणार असून त्यांच्या मक्तेदारीला लगाम बसणार आहे. सरपंच कोणाला करायचे याबाबतचे सर्वाधिकार आता जनतेच्या हातामध्ये असल्यामुळे आजतागायत ज्यांनी ग्रामपंचायतीची सत्ता उपभोगली आहे, अशा व्यक्तींना एखाद्या खड्यांप्रमाणे दूर करण्याची संधी आता जनतेला मिळाली आहे.
स्थानिक नेत्यांकडून बिनविरोधसाठी हालचाली
गावात जेवढे पक्ष, तेवढे गट असतात. काही गावात एकाच पक्षाचे दोन ते तीन गट आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. आपल्या गटाच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र बोलावून त्यांचे मत आजमावले जात आहे. एका गटाला सरपंच पद, दुसऱ्या गटाचा उपसरपंच तर इतरांना सदस्य पद अशी विभागणी करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून हालचाली सुरु आहेत.
Previous Articleशिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्ह व लेटरहेडचा गैरवापर
Next Article यल्लम्मा डोंगरावर करोडो रुपयांची उलाढाल









