वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा जवळजवळ 43 वर्षांनी 28 एप्रिल 2026 रोजी साजरी करण्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे कंग्राळी बुदुक ग्रा.पं. हद्दीत परंतु सध्या बेळगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये समाविष्ठ झालेल्या गावच्या पूर्व व दक्षिण दिशेकडील भागातील रस्ते, काँक्रीट गटारीसह इतर नागरी समस्या श्री लक्ष्मीयात्रेपूर्वी सोडवून नागरिकांना दिलासा देण्याच्या मागणीचे निवेदन कंग्राळी बुद्रुक ग्रा.पं. देवस्थान पंचकमिटी, यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने ग्रा.पं.अध्यक्षा रोहिणी नाथबुवा यांच्या हस्ते बेळगाव उत्तरचे आमदार असिफ राजू सेठ यांना शनिवारी देण्यात आले. निवेदन देताना ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील म्हणाले, जवळजवळ 43 वर्षांनी आपल्या गावची ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवीची यात्रा मोठ्या उत्साहात भरणार आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या हद्दीतील सांडपाणी कंग्राळी बुद्रुक ग्रा. प.हद्दीत मार्कंडेय नदीत वाहून येत आहे. या सर्व गटारींचे काँक्रीटीकरण करून सांडपाणी सोडावे.
श्री विठ्ठलाई देवी मंदिरमध्ये कूपनलिका खोदाई करणे, तसेच शौचालय, स्वच्छतागृह व बाथरूमची सोय करून देणे, कंग्राळी बुद्रुक ग्रा.पं.हद्दीतील परंतु सध्या बेळगाव महानगरपालिकेमध्ये समाविष्ठ झालेल्या पूर्व व दक्षिण दिशेकडील उपनगरातील रस्ते, गटारी, पाणी व इतर नागरी समस्या सोडवून देण्यासाठी मोठा शासकीय निधी मंजूर करून यात्रेपूर्वी सर्व नागरी समस्या सोडवून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी आमदार असिफ (राजू) सेठ यांच्याकडे ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली. प्रारंभी कंग्राळी बुद्रुक ग्रामस्थांतर्फे आमदार असिफ (राजू) सेठ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आम असिफ सेठ यांनी निवेदनाचा स्वीकार करून 28 एप्रिल 2026 श्री लक्ष्मीदेवी यात्रेपूर्वी सर्व नागरी समस्या सोडवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा रोहिणी नाथबुवा, ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, अनिल पावशे, भारती पाटील, सहदेव राजकट्टी, सुषमा कोळींसह देवस्थान पंचकमिटी सदस्य, यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.









