प्रशासकीय बदल्यांसोबतच विनंती बदल्या करण्याची संघटनांची मागणी; बदल्यांना परवानगी देण्याबाबत अपर सचिवांकडे केली मागणी; पुढील आठवड्यात सर्व बदल्या होण्याची शक्यता
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून बुधवारी ग्रामसेवकांची विनंती आणि आपसी बदली केली जाणार होती. पण शासनाकडून मंगळवारी अचानक प्रशासकीय बदलीला स्थगिती देण्यात आली. परिणामी प्रशासकीय बदली प्रक्रियेत सहभागी असलेल्या ग्रामसेवकांना विनंती बदलीसाठी अर्ज करता आला नाही. त्यामुळे प्रशासकीय बदलीसोबतच विनंती व आपसी बदली करण्याची ग्रामसेवक संघटनांनी मागणी केली. त्याची दखल घेऊन ग्रामसेवकांच्या प्रशासकीय बदलीला परवानगी देण्याच्या मागणीचे पत्र ग्रामपंचायत विभागकडून अपर सचिवांना पाठविण्यात आले. त्याला मंजूरी मिळाल्यानंतर पुढील आठवड्यामध्ये प्रशासकीयसोबतच विनंती आणि आपसी बदल्या केल्या जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदमध्ये 2014 पासून आरोग्य कर्मचारी आणि ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्यांना स्थगिती आहे. बदल्यांमध्ये दहा टक्के प्रशासकीय तर दहा टक्के विनंती बदल्या करावयाच्या असतात. परंतू गेल्या सात ते आठ वर्षांपासून ग्रामसेवकांच्या प्रशासकीय बदल्याच झाल्या नव्हत्या. त्यामुळे ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्याचा आदेश सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे प्रशासकीय बदलीची तयारी सुरू करण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी बदली प्रक्रिया राबविली जाणार होती. यामध्ये 66 ग्रामसेवकांची प्रशासकीय तर 33 ग्रामसेवकांची विनंती तर 16 ग्राम विकास अधिकाऱ्यांची प्रशासकीय आणि 8 ग्राम विकास अधिकाऱ्यांची विनंती बदली तसेच 6 विस्तार अधिकारा अधिकारीही बदलीस पात्र आहेत. पण मंगळवारी शासनाने पुन्हा प्रशासकीय बदली प्रक्रिया स्थगित केल्यामुळे ऐनवेळी विनंती बदलीसाठी अन्य ग्रामसेवकांना अर्ज देता आले नाही. त्यामुळे केवळ विनंती बदल्या करू नयेत अशी ग्रामसेवक संघटनांनी मागणी केली. तसेच प्रशासकीय बदलीस परवानगी द्यावी अशी मागणी संघटनांनी ग्रामविकास विभागाकडे केली आहे.
ग्रामसेवक संघटनांच्या मागणीची दखल घेऊन जि.प.च्या ग्रामपंचायत विभागाकडूनही प्रशासकीय बदल्यांना परवानगी देण्याबाबतचे पत्र लवकरच अपर सचिवांना पाठविले जाणार आहे. या मागण्यांची दखल घेऊन शासनाकडून ग्रामसेवकांच्या प्रशासकीय बदलीला परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात बुधवार किंवा गुरुवारपर्यंत पुन्हा प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांची प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता आहे.









