बेळगाव तालुक्यात 12 लाख 31 हजार 600 रुपये वितरीत : 947 सदस्यांना मिळाले मानधन, 2022 ते 2023 पर्यंत वितरण
बेळगाव : मागील सहा महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडाला होता. यामुळे अनेक ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचे मानधन देण्यात आले नव्हते. आता ते वितरीत करण्यात आले असून 2022 पासून थकीत असलेले मानधन फेब्dरुवारी 2023 पर्यंत वितरीत करण्यात आले आहे. बेळगाव तालुक्यात एकूण 12 लाख 31 हजार 600 रुपये मानधन वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत असून उर्वरित मानधनही लवकरच वितरीत करण्यात येणार असल्याचे तालुका पंचायतच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्षांचे मानधन देण्यात आले नाही, अशा तक्रारी होत्या. दरम्यान, ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचेही आरक्षण जाहीर करण्यात आल्याने अनेकांना मानधन जमा झाले की नाही, याची माहिती नाही. अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीसाठी अनेक मोठे खेळ रचले जात आहेत. त्यामुळे मानधनाकडे अनेकांनी कानाडोळा केल्याचेच दिसून येत आहे. मात्र तालुक्यातील 57 अध्यक्ष, 57 उपाध्यक्ष व 947 सदस्यांच्या खात्यावर मानधन जमा करण्यात आले आहे.
मानधनासाठी सदस्यांनी झिजवल्या पायऱ्या
निवडणुकीपूर्वी काही सदस्य मागील अनेक महिन्यांपासून ग्राम पंचायतीबरोबरच तालुका पंचायतीच्याही पायऱ्या झिजवत होते. याबाबत अनेकदा ग्राम पंचायतींतील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अद्याप शासनाकडूनच मानधन न आल्याने आपण कुठले मानधन देणार? असा प्रतिसवाल त्यांनी केला आहे. यामुळे सर्वच माजी सदस्य, अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची गोची झाली होती. मात्र लवकरच मानधन जमा करण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
2023 पासून मानधनात वाढ
मागील सहा महिन्यांपासून सदस्य, अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे मानधन काढण्यात आले नाही. यामुळे अनेकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी मागील मानधनासाठी अनेकांनी तारेवरची कसरत केली आहे. 2022 सालात सदस्यांना 1000, उपाध्यक्षांना 2000 तर अध्यक्षांना 3000 रुपये मानधन देण्यात येत होते. त्यामध्ये आता वाढ करून जानेवारी 2023 पासून सरकारने सदस्यांना 2000 ऊपये, उपाध्यक्षांना 4000 ऊपये आणि अध्यक्षांना 6000 ऊपये मानधन वाढविले आहे. त्यामुळे आता सदस्यांतूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सरकारकडून वारंवार मानधन देण्यासाठी टोलवाटोलवी केली जाते. त्यामुळे मानधन मागणीकडेही सदस्यांनी कानाडोळा केला. परिणामी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांचे मानधनच काढण्यात आले नाही अशी ओरड नित्याचीच बनली आहे. दरम्यान, आता यामध्ये सुधारणा होत आहे. बेळगाव तालुक्यातील सदस्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या तालुक्यातील 57 ग्राम पंचायतीमधील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांचा मिळून एकूण 12 लाख 31 हजार 600 रुपये देण्यात आले आहेत. याचबरोबर मार्च, एप्रिल, मे व जून महिन्यांचे मानधन देणे बाकी आहे. त्यामुळे उर्वरित मानधनही तातडीने द्यावे, अशी मागणी होत आहे.
दर महिन्याला मानधन जमा करावे
बेळगाव तालुक्यात मागील वर्षी निवडणुकीत 54 ग्राम पंचायती होत्या. यामध्ये आता वाढ झाली असून ती संख्या आता 59 कडे गेली होती. त्यातही आता मच्छे व पिरनवाडी नगरपंचायत करण्यात आल्याने ग्राम पंचायतींची संख्या 57 वर पोहोचली आहे. मागीलवेळी निवडून आलेल्या सदस्य, अध्यक्ष व उपाध्यक्षांना केवळ एक वर्षांचे मानधन मिळाले होते. आता यामध्ये सुधारणा होत असून महिन्यामहिन्याला मानधन जमा व्हावे, अशी मागणी होत आहे.









