असळज, विजय पाटील,प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतीचे दाखले आता नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत.यामुळे नागरिकांना कोणत्याही ठिकाणी कोणत्याही ग्रामपंचायातीमधील नोंदणीकृत असेसमेंट उतारा, दारिद्र्य रेषेचा दाखला, जन्माचा दाखला, मृत्यू दाखला घरबसल्या मिळणार आहेत.
ग्रामविकास विभागाचे महा ई ग्राम अॅप आता नागरिकांनी आपल्या फोनमध्ये डाऊनलोड केल्यास त्यांना महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही ऑनलाइन झालेल्या ग्रामपंचायतीमधील वरीलप्रमाणे दाखले घरबसल्या मिळणार असल्याने आता नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.यासाठी मात्र इंटरनेटची नागरिकांना गरज असणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील १०२५ ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यत १९९३२ नागरिकांनी महा ई ग्राम अॅपमध्ये आपली नोंदणी केली आहे.यामध्ये १४९ नागरिकांनी ३११ दाखले ऑनलाइन आतापर्यंत मागितले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गगनबावडा तालुक्यात ४४ नागरिकांनी ७७ दाखले ऑनलाइन घेतले आहेत. सध्याच्या आधुनिक युगात नविन महा ई ग्राम अॅपने नागरिकांना घरफाळा कर,पाणीकर ऑनलाइन पद्धतीने ग्रामपंचायतीस महा ई ग्राम अॅपच्या माध्यमातून भरता येणार असल्याने नागरिकांच्या वेळेत बचत होणार आहे. या अॅप ची नुकतीच सुरवात झाली असल्याने दिवसेदिवस यामध्ये नागरिकांच्या नोंदणीमध्ये वाढ होत आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध माध्यमातून या अॅपचा प्रचार व प्रसार सुरु आहे.
मोबाईल मध्ये अॅप कसे घ्याल ?
यासाठी नागरिकांनी प्लेस्टोरमध्ये जाऊन महा ई ग्राम सिटीझन कनेक्ट सर्च करून अॅप डाऊनलोड केल्यास हे अॅप वापरता येईल.
महा ई ग्राम नागरिकांच्या फायद्याचे –
नागरिकांना ग्रामपंचायत मार्फत दाखले काढावयाचे असल्यास ग्रामपंचायत कार्यालयात वेळ वाया न घालवता महा ई ग्राम द्वारे घरबसल्या दाखले मिळणार आहे.त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे.
राकेश पोवार ,तालुका व्यवस्थापक पंचायत समिती गगनबावडा
Previous Articleचिनी रेस्टॉरंटवर काबूलमध्ये हल्ला
Next Article आचरा गाऊडवाडी येथील सखाराम गावकर यांचे निधन









