आवाहनाला नागरिकांचा प्रतिसाद : कारागृह प्रशासनाविरोधात संताप
वार्ताहर /हिंडलगा
हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात बसविलेल्या मोबाईल जॅमरमुळे सर्व मोबाईल सेवा, इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने आसपासच्या पाच किलो मीटर अंतराच्या क्षेत्रात परिणाम झाला आहे. ही क्षमता कमी करून कारागृह मर्यादित ठेवावी, या उद्देशाने दि. 17 फेब्रुवारी रोजी ग्राम पंचायतमार्फत कारागृह अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती यांना निवेदन दिले होते. परंतु या निवेदनानंतर पाच दिवसांत क्षमता कमी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु कारागृह अधीक्षकांनी ही मागणी पूर्ण न केल्याने मंगळवार दि. 4 मार्च रोजी बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील कारागृहासमोर ग्राम पंचायतमार्फत पुकारलेला रास्तारोको यशस्वी करण्यात आला. ग्राम पंचायत अध्यक्ष मीनाक्षी हित्तलमणी यांनी सर्व सदस्यांना आवाहन केल्याप्रमाणे सर्वांनी या रास्तारोकोत भाग घेतला.
या रास्तारोकोत विविध संघटना, व्यापारीवर्ग, पतसंस्था, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनीदेखील उत्स्फूर्तपणे भाग घेतला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. लागलीच वडगाव ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविली. या रास्तारोको आंदोलनात आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थांनी व लोकप्रतिनिधीही सहभाग दर्शविला. कारागृह प्रशासनाच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून गेला. रस्त्यावर ठिय्या आंदोलनामुळे कारागृह प्रशासनाला जाग आली व कारागृह अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती अधिकाऱ्यांसमवेत उपस्थित झाले. याप्रसंगी ग्रा. पं. उपाध्यक्ष चेतना अगसगेकर, सदस्य रामचंद्र कुद्रेमणीकर, नागेश मन्नोळकर, डी. बी. पाटील, स्नेहल कोलेकर, अशोक कांबळे, उमा सोनवडेकर, तसेच निवृत्त सुभेदार मेजर चंद्रकांत कडोलकर व विद्यार्थ्यांनी समस्यांविषयी माहिती दिली. ग्राम पंचायत अध्यक्ष मीनाक्षी हित्तलमणी यांच्या हस्ते निवेदन सादर केले.
यावेळी हिंडलगा कारागृहातील कैद्यांकडे मोबाईल येतातच कसे? याचा शोध प्रथम कारागृह अधिकाऱ्यांनी घ्यावा. कारागृहात अधिकाऱ्यांचा वचक नसल्यामुळेच हे सर्व चालत आहे. जॅमरची क्षमता वाढविल्याने ग्राम पंचायत कामकाज, आर्थिक संस्था, व्यापारीवर्ग व विद्यार्थ्यांना याचा त्रास होत असल्याचे पटवून दिले. यावेळी निवेदनाचा स्वीकार करून म्हणाले की, कारागृहातील मोबाईल जॅमरची सुधारणा केली आहे. पूर्वी टू जी असणाऱ्या जॅमरची क्षमता फोर जी, फाईव्ह जी केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता व कारागृहातील कर्मचाऱ्यांनाही समस्या होत आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना, तसेच तज्ञ कमिटीला संपर्क साधून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. एका दिवसात क्षमता कमी न झाल्यास पुन्हा रास्तारोको करण्याचा इशारा कारागृह अधीक्षक व प्रशासनाला दिला. या रास्तारोकोत सर्वच ग्रा. पं. सदस्य, माजी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, युवावर्ग, विद्यार्थीवर्ग, व्यापारीवर्ग, आजूबाजूच्या आंबेवाडी, सुळगा, मण्णूर, बेनकनहळ्ळी, गणेशपूर भागातील नागरिकांनीही भाग घेतला. यावेळी वडगाव ग्रामीण पोलीस स्टेशन व कॅम्प पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.









