प्लास्टिकसदृश तांदळांमुळे गृहिणी धास्तावल्या : खात्याने त्वरित स्पष्टीकरण देण्याची गरज
पणजी : कोट्यावधी ऊपयांच्या धान्यांची नासाडी झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेले नागरी पुरवठा खाते आजही लोकांना सुखानसुखे अन्न खाऊ देण्याच्या तयारीत नसावे असे आणखी एक प्रकरण सध्या उजेडात आले आहे. सार्वजनिक वितरणासाठी आणलेली तूरडाळ, चणाडाळ, साखर आदी कुजवून कोट्यावधींचे नुकसान केलेल्या या खात्याने आता संशय निर्माण व्हावा असा तांदूळ लोकांच्या माथी मारला आहे. या तांदळात प्लास्टिकसदृश दाणे सापडल्यामुळे लोक अचंबित झाले आहेत. त्यामुळे आता स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य खायचे तरी कोणते? असा सवाल निर्माण झाला आहे.
पाण्यात तरंगतो तांदूळ
गत महिन्यात अनेकांना असे प्लास्टिकसदृश तांदूळ मिळाले होते. त्यावरून खास करून गृहिणींच्या मनात संशयाची पाल चुकचुकली होती. हे तांदूळ धुण्यासाठी पाण्यात टाकल्यानंतर ते तरंगत असल्याचे दिसून आले. खरा तांदूळ कधीच पाण्यावर तरंगत नाही. तो थेट भांड्याच्या तळाशी जातो. हा वर्षांनुवर्षांचा अनुभव पदरी असल्यामुळे या तरंगणाऱ्या तांदळांबद्दल गृहिणींच्या मनात संशय अधिक बळावला. असा संशयास्पद तांदूळ हाती लागल्यामुळे काही महिलांनी त्यातील काही दाणे दातांनी चिरडून पाहिले, परंतु त्यांचे दोन तुकडे होण्यापेक्षा ते तिथल्या तेथेच प्लास्टिकसारखे दाबत असल्याचे तसेच काही तांदळांतून दूधसदृश पातळ पदार्थ निघत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
रेशन धान्याबाबत भीती व्यक्त
त्याही पुढे जाताना अन्य काही महिलांनी असे निवडक तांदूळ तप्त तव्यावर टाकून रबरप्रमाणे वितळतात की काय हेही तपासून पाहिले. परंतु तसे काही घडले नाही, अशी माहिती एका गृहिणीने दिली. आता या तांदळांबद्दल एका गृहिणीने थेट व्हिडिओच बनवला असून सध्या तो समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे रेशनवरील धान्यासंबंधी लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, यापूर्वी एकदा अशा तांदळांसंबंधी माहिती देताना खात्याचे मंत्री रवी नाईक यांनी तो तांदूळ ’फॉर्टिफाईड’ (पौष्टिक गुणधर्मयुक्त) असल्याचे म्हटले होते. परंतु सध्या मिळालेला तांदूळ म्हणजे ‘तोच’ असेल, याची खातरजमा कशी करायची आणि त्यावर विश्वास कसा ठेवायचा? हा प्रश्न महिलांना सतावू लागला आहे.
सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये माहिती देणाऱ्या महिलेने सदर तांदळाबद्दल भीती वाटल्यामुळे आपण तो खाणेच बंद केल्याचे म्हटले आहे. वरकरणी ‘स्वच्छ’ दिसत असल्यामुळे जास्त निवडण्यास न बसता थेट धुण्यासाठी पाण्यात टाकले असता त्यातील बरेच दाणे तरंगू लागले. सदर प्रकार पाहून अचंबित झाल्यामुळे आपण तो अनेक प्रकारे तपासून पाहिला. मुलांकडूनही तपासून घेतला. परंतु यापूर्वी असा प्रकार कधी अनुभवलाच नसल्यामुळे कुणीच स्पष्टपणे काही सांगू शकत नव्हते, असे तिने म्हटले आहे. न्य एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशी पोळे बनवणार म्हणून आपण हा तांदूळ रात्री पाण्यात भिजण्यास घातला होता. सकाळी उठून पाहते तर ते शिजवलेल्या भाताप्रमाणे फुगून लठ्ठ झाले होते, त्यामुळे संशय आल्यामुळे आपण ते फेकून दिले, असे तिने सांगितले. त्यामुळे आता लोकांनी स्वस्त मिळते म्हणून रेशनवरील धान्य डोळे झाकून खाऊ नये, असे आवाहन तिने केले आहे.









